अखेर जेसीबी चालला ! नगरसेवकाचे बहुचर्चित बांधकाम तोडले; अतिक्रमण हटावचा दणका

नंदुरबार – शहरवासीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या अतिक्रमणांचा विळखा उखडून टाकणारी कारवाई अखेरीस नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासनाने दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना सुरू केली आहे. आज दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान नंदुरबार नगर परिषदेचे प्रशासक पुलकित सिंह यांनी अचानक मोहिमेचा प्रारंभ केला आणि नंदुरबार पंचायत समिती परिसरातील व शहराच्या मध्यवर्ती भागातीलही काही अतिक्रमित टपऱ्या हटवल्या.
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या या पहिल्या टप्प्यातच सत्ताधारी गटाच्या एका नगरसेवकाला फटका बसला असून  अतिक्रमण हटाव मोहीम पुढे आणखी कोणता रंग धारण करते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. आपणच शहराचे मालक;  अशा भूमिकेत येऊन अनेक राजकीय महाभाग नंदुरबार शहरातील रस्ते व्यापणारे अतिक्रमण बिनधास्तपणे अनेक वर्षापासून करून बसले आहेत. डोळ्यादेखत जाहीरपणे दिसणारी अशी अनेक कायदेबाह्य बांधकामे शहरवासीयांच्या चर्चेचा विषय आहेत. मात्र, आज अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम स्टेट बँक चौक पासून अमर थिएटरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अशा बहुचर्चित अतिक्रमणापैकी काही उखडून टाकत प्रशासनाने दणका दिला. पंचायत समितीच्या शासकीय कार्यालयाला देखील अतिक्रमणाचा  विळखा बसला होता. आज काही प्रमाणात ते मोकळे झालेले दिसले.
शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात वाहनांची संख्या वाढत आहे. अशातच १० ते १५ वर्षांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असतांना सत्ताधारी किंवा विरोधकही त्याबाबत फारसे गांभीर्याने घेत नव्हते. विद्यमान स्थितीत प्रशासकांच्या हाती सूत्र असल्यामुळे प्रशासक पुलकित सिंह यांनी प्राधान्याने नंदुरबारचे रस्ते व्यापणाऱ्या अवैध बांधकामांना हटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून मागील दोन आठवड्यांपासून पालिकेकडून अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसांचे सत्र सुरू होते. तरीही प्रत्यक्षात अतिक्रमण कधी काढले जाईल, याबद्दल लोक साशंक होते. परंतु पुलकित सिंह यांनी आज खरोखरचा दणका दिला आणि राजकीय मुलाहिजा न ठेवता यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स च्या मागील बाजूस केलेले शेडचे अवैध बांधकाम तसेच तिथून पुढे देसाईपूरकडे जाणारा रस्त्यावरील कॉम्प्लेक्सचे अतिक्रमित बांधकाम तोडण्यात आले. सत्ताधारी गटातील एका बड्या नगरसेवकाचा संदर्भ या अतिक्रमणाशी जोडला जात आहे.
दरम्यान, शहरातील सर्वच भागातील रस्त्यांचा सर्व्हे सुरू असून, त्यानुसार १००पेक्षा अधीक अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात येत असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. अतिक्रमण असलेला भाग काढण्याआधी तो चिन्हांकित करणार आहेत. त्यामुळे तेव्हाढा भाग स्वतः अतिक्रमणधारकाने काढावा हा त्यामागचा उद्देश असणार आहे. अतिक्रमण काढण्यासंदर्भात पालिकेने आवश्यक ते सर्व नियोजन केलेले आहे. कुठल्या दिवशी याबाबत कारवाई सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!