अखेर विरचक धरण भरले, पाणी चिंता संपली; 17 गावांना दिला इशारा

नंदुरबार – चालू असलेल्या सतत धार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिवण (विरचक) मध्यम प्रकल्पात जवळपास 100% जलसाठा झाला असून त्यातील पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यामुळे शिवण नदी काठावरील सुमारे 17 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या विषयी नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार या विभागाने कळविले आहे की, शिवण (विरचक) मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यास्थितीत पाणी पातळी २३८ मी.ची नोंद झाली आहे. प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी २३९.३० मी. असून धरण आणि पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यानुसार शिवण धरणात पाण्याचा येवा वाढल्यास धरणाचे वक्रद्वारे उघडून शिवण नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. म्हणून शिवण नदी काठावरील विरचक, पाटलीपाडा, खामगांव, बिलाडी, नारायणपुर, पापनेरपाडा्, सुंदरदे, करणखेडा, बद्रीझिरा, राजापुर, भवाली, धुळवद, व्याहूर, नळवे बु., वेलदा, कविठे, नेव व इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जावू नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत.
*शहराच्या पाण्याची चिंता मिटली*
मागील वर्षी आणि त्या आधीही पुरेसा पाऊस झाला नव्हता त्यामुळे नंदुरबार शहराला दोन वर्षापासून पाणी कपातीचा सामना करावा लागला. यंदा पुरेसे धरण भरले नाही तर पुन्हा पाणी संकट उद्भवेल की काय ही शंका शहरवासीयांच्या मनात होती. परंतु जुलै अखेर झालेल्या पावसामुळे ऑगस्टच्या प्रारंभीच विरचक धरणात पन्नास टक्के पाणीसाठा झाला होता. या आठवड्यात सलग चांगला पाऊस होत असून सलग तीन दिवस झाले सतत धार पाऊस होत असल्याने विरचक धरणातील पाणीसाठा यंदा शंभर टक्के पूर्ण होणार हे स्पष्ट झाले आहे. परिणामी शहरवासीयांची पाणी चिंता यंदा संपुष्टात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!