अजबच! व्हाट्सअप ग्रुपद्वारे लुबाडले 67 लाख रुपये; सायबर पोलीस घेताहेत शोध

नंदुरबार – फेसबुकवरून अथवा व्हाट्सअप द्वारे लोकांना गंडवायचे, आमिष दाखवून गुंतवणुकीला भाग पाडायचे हा सायबर क्राईम चा नवा फंडा सध्या जोरदार चालू असून तसल्याच प्रकाराला बळी पाडून सुमारे 67 लाख रुपयात एका हॉटेल चालकाला लुबाडल्याचे उघडकीस आले आहे.

अमुक रक्कम गुंतवल्यावर भरघोस परतावा मिळेल, असे अमिष दाखवून फेसबुक वरील एका ग्रुपने अक्कलकुवा तालुक्यातील खापर शहरातील हॉटेल चालकाला चक्क 67 लाख रुपयात लुबाडले आहे. या हॉटेल चालकाने दिलेल्या फिर्यादीनंतर 3 ग्रुप ॲडमिन विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सायबर पोलीस आता या अज्ञात लोकांचा शोध घेत आहेत.

अमुक गुंतवणूक केल्यास इतके-तितके पट परतावा दिला जाईल, किंवा आमच्याकडे रक्कम गुंतवल्यास तुम्हाला भरघोस व्याज देऊन चारपट, पाचपट रक्कम परत केली जाईल; अशा तऱ्हेच्या आकर्षक परंतु फसव्या घोषणा दिल्या जातात आणि गुंतवणूकदारांची लुबाडणूक केली जाते, हे आतापर्यंत शेकडो घटनांमधून पहायला मिळाले आहे. तरीही लोक अशा फसव्या गुंतवणुकीला आणि आमिषाला बळी कसे पडतात? हा प्रश्न या घटनेमुळे केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार खापर येथील नारायण दादा नगर मधील रहिवासी हॉटेल चालक नासीर लुकमन खान (वय ५६ वर्ष) हे मणक्याच्या आजारामुळे अंथरुणावर पडून होते. पडल्या पडल्या वेळ घालवायचा म्हणून ते व्हाट्सअप आणि फेसबुकवर रमायला लागले. अशातच फेसबुक वरील एका ग्रुप शी त्यांचा संपर्क झाला. अमुक रक्कम गुंतवल्यास इतक्या टक्के व्याजाने परतावा मिळेल, अशा स्वरूपाची माहिती वाचल्यावर ते अधिक खोलात शिरत गेले. त्यातूनच काही व्हाट्सअप ग्रुपशी संपर्क झाला. त्या ठिकाणी अन्य इतर बरेच लोक रक्कम गुंतवत आहेत आणि त्यांना वेळोवेळी मोठा नफा मिळत आहे; असे वारंवार त्यांना पाहायला मिळाले आणि आपसूकच नासिर खान यांनी स्वतःची रक्कम पाठवून गुंतवणूक करायला सुरुवात केली. संबंधित एडमिन रक्कम जमा होत असल्याची खोटी माहिती ग्रुप वर टाकत राहिले. याविषयी दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, संबंधित व्हॉटसऍप ग्रुप अॅडमीन यांच्या बँक अकांऊटवर दि.१ जानेवारी २०२४ रोजी पासुन ते ११ जून २०२४ पावेतो वेळोवेळी 67 लाख 1 हजार रुपये जमा केले. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे कधीही परतावा मिळाला नाही.

नासीर लुकमन खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ए5- विन्टोन स्टॉक पुलिंग गृप या व्हॉटसऍप ग्रुपची ऍडमिन श्रीया अकेला (मोबाईल क्रमांक- ७२९६०५९२११ व ८०९२४९७३२२ (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही.), 54 केकेआरसीए स्टॉक या व्हॉटसऍप ग्रुपचा ऍडमिन अनुराग ठाकूर मोबाईल क्रमांक ८७६४२५१३७८ व ९८६३९२३७७१ (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही.) आणि अरिहंत कॅपिटल कस्टमर केअर एडमीन रोनक (क्रमांक ८२९७५९८१५३) अशा तीन जणांविरुद्ध संगनमत करुन फसवणुक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा सायबर सेल याचा अधिक शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!