अजितदादा गटाचे काटे गतिमान; जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर अभिजीत मोरे यांची निवड

नंदुरबार – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी डॉ.अभिजित दिलीपराव मोरे यांची निवड केली. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 80 टक्के पदाधिकारी अजितदादा गटा समवेत असल्याचा दावा डॉक्टर अभिजीत मोरे यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते डॉक्टर अभिजीत मोरे यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करीत असल्याचे पत्र नुकतेच देण्यात आले त्याप्रसंगी जिल्ह्यातील आणि पक्षातील मान्यवर उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आधीपासून डॉक्टर अभिजीत मोरे हेच होते. परंतु अंतर्गत मतभेदामुळे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांना पूर्ण क्षमतेने गतिमान वाटचाल करता येत नव्हती. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन होऊन प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात विभागले गेले. नंदुरबार जिल्ह्यात देखील तेच घडले. माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात काही पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवार गटात सामील झाले तर काही पदाधिकारी व कार्यकर्ते डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वात अजितदादा पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. परिणामी मतभेदाचा अडथळा दूर झाल्यामुळे अभिजीत मोरे यांच्या कारभाराला गती येऊन नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे काटे वेगाने फिरतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वात पक्ष पुढे जाणार असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. राऊ मोरे यांनी अजितदादा गटाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करीत असल्याचे जाहीर दर्शविण्यासाठी शहराच्या विविध भागातील शाखाप्रमुखांचे छायाचित्र असलेले फलक लावून तसेच अन्य गावातील शाखा फलक पालटून एक निराळी मोहीम सुरू केली आहे.
अजित दादा पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार सोबत जाण्याचा निर्णय केला त्याच वेळेस डॉक्टर अभिजीत मोरे यांनी भावी राजकीय भवितव्याचा विचार करून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. सर्वानुमते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. बुधवार, दि. ५ जुलै रोजी मुंबई येथील अजित पवार यांच्या मेळाव्यास शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जाऊन नूतन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सत्कार करून अभिनंदन केले. तसेच १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर “आम्ही नंदुरबारकर तुमच्यासोबत”  असल्याचे प्रतिज्ञापत्र देखील लिहून दिले. जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या समवेत तेव्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. राऊ मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी जोशी, प्रदेश सदस्य निखिल तुरखिया, मधुकर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
अजितदादा यांनी डॉक्टर अभिजीत मोरे यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यामागे कौटुंबिक संबंधांची निराळी पार्श्वभूमी देखील आहे. नंदुरबारच्या मोरे कुटुंबाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत तसेच पवार कुटुंबासोबत घनिष्ठ संबंध आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद मोरे कुटुंबाकडे आहे. त्यांच्यासाठी शरद पवार यांच्यासोबतच अजित पवार ही तेवढ्याच आदराचे व महत्त्वाचे आहेत. मात्र सध्या तरूण जनरेशनचा विचार केल्यास त्यांचे अजित पवारांशी राजकीय संबंध जास्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!