‘अतिक्रमणा’चा मुद्दा तापला; विरोधी व सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे शहरवासियांचे लक्ष

नंदुरबार (योगेंद्र जोशी) –  फार्म हाऊसचे अतिक्रमण काढून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वतःपासूनच अतिक्रमण हटाव मोहीम राबवायला सुरुवात करावी, असे आव्हान भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना  दिले आहे. जिल्हाधिकारी यांनी बंदोबस्तासह प्रशासकीय मदत दिली तर आम्ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवायला तयार आहोत; असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. त्यावर चौधरी यांनी हे आव्हान दिले असून शहरातील विक्राळ बनलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मोहीम राबविण्याचे आव्हान सत्ताधारी पूर्ण करतील का ? विरोधी पक्ष शेवटपर्यंत मुद्दा लावून धरणार काय ? प्रशासन खरोखर दखल घेईल का ? याकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.
लहान मोठा व्यावसाय व रहिवास करणाऱ्यांनी मनाला वाटेल तेवढे अतिक्रमण करीत शहरातील प्रत्येक रस्त्यालगत आणि प्रत्येक वसाहतीत सार्वजनिक जागेचे लचके तोडणे चालू ठेवले आहे. वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊन अपघातप्रवणता यामुळे वाढली आहे. धुळे चौफुली ते भोणे फाटा, गिरीविहार गेट ते सीबी पेट्रोल पंप, गावित पेट्रोल पंप ते पातोंडा रस्ता, धुळे चौफुली ते दंडपाणेश्वर नवापूर बायपास रस्ता सर्वत्र हे पाहायला मिळते. लोखंडी टपऱ्या टाकून रस्ते, जागा बळकवायच्या आणि वसुली खिशात घालायची, असा उद्योग करणाऱ्या टोळ्या बनल्या आहेत. हॉटेल दुकानांचे बांधकाम वाढवून बिनधास्तपणे रस्ता गिळणे चालू ठेवले आहे. टेकडी पासून रस्त्यापर्यंत ऐसपैस बांधकाम उभारणाऱ्यांनी आणि गॅरेजवर येणाऱ्या गाड्या रस्त्यावर मुक्कामी ठेवणाऱ्यांनी चौपदरी बनलेला धुळे रस्ता दुपदरी करून टाकला. शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि नगरपालिका प्रशासन नंदुरबार वासियांना हक्काचे चालणे धावणे कधी शक्य करणार ? हा प्रश्न लोकांना सतावत असतो. परंतु सत्ताधारी, विरोधी राजकारणी आणि सर्व अधिकारीसुद्धा निव्वळ हतबलतेचा अभिनय करत असतात. बेकायदेशीर बांधकाम हटवण्याला पाठबळ देण्याची राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती जणु उरलेली नाही.
दरम्यान माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी झराळी फार्महाऊसवर पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, कोणीही नगराध्यक्ष बनले तरी अतिक्रमण हटाव मोहीम राबवू शकत नाही हे आजचे वास्तव आहे. त्यासाठी प्रशासनाची मदत आवश्यक आहे. कलशेट्टी हे जिल्हाधिकारी असताना पालिकेच्या वतीने अशी मदत मागण्यात आली होती. त्यांनी पालिकेला ठराव करून मागितला तोही दिला. डॉक्टर भारुड हे जिल्हाधिकारी असतानासुद्धा पुन्हा मागणी केली. परंतु अद्याप पुढे काही घडलेले नाही. म्हणून विद्यमान जिल्हाधिकार्‍यांकडे प्रयत्न करणार आहोत. नगरपालिका निवडणुकीत काय परिणाम होतील, याला मी घाबरत नाही कारण जे बेकायदेशीर असेल ते हटवले पाहिजे या मताचा मी आहे, असेही रघुवंशी म्हणाले आहेत.
यावर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी लगेचच क्लिप व्हायरल करीत आव्हान दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, रघुवंशी हे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करणार असतील तर स्वागत आहे. पालिकेतील विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक त्यांच्या निर्णयाचे समर्थनच करतील. परंतु माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना जर नंदुरबार शहराचे बेकायदेशीर अतिक्रमण काढायचेच असेल तर, त्यांनी प्रथम आपले स्वतःचे झराळी येथील बेकायदेशीर असलेले बिके फॉर्म हाऊसचे अतिक्रमण काढण्यापासून सुरुवात करावी, व्हायरल केलेल्या व्हिडिओ क्लिप मध्ये ते पुुढे म्हणतात की, अतिक्रमण काढण्यास आमचा विरोध नसून आमचा आपणास पाठिंबाच आहे. नंदुरबार शहरातील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा अत्यंत रास्त आहे. परंतु अतिक्रमण काढण्यास सुरुवात करत असाल तर नंदुरबार शहराच्या राजमाता स्वर्गीय डॉक्टर कमलताई मराठे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन जे अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती व त्यावर जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकेस अतिक्रमण काढण्यासाठी आदेश दिले होते, ते अतिक्रमण देखील प्रथमत: काढून दाखवावे, असेही माजी आमदार शिरीष चौधरी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!