अतिक्रमण नडले; सरपंच-उपसरपंचासह तिघांना ठरविले अपात्र; फेस ग्रामपंचायतचे प्रकरण

नंदुरबार – अतिक्रमित शेतजमीन बाळगून असल्याचे सिद्ध झाल्यामुळे शहादा तालुक्यातील फेस ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच आणि एक सदस्य अशा तिघांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणात निलेश सागर अपर आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी दिलेल्या आदेशात “ग्रामपंचायत फेस येथील सदस्य पदावर पुढे चालु राहण्यासाठी अपात्र / अनर्ह ठरविण्यात येत आहे”; असे स्पष्टपणे म्हटले आहे.

राजश्री गणेश पाटील, लहु पुना भिल, पद्मा रगदेव भिल रा. फेस, ता. शहादा, जि. नंदुरबार अशी या तिघांची नावे आहेत. यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी फेस शिवारातील सरकारी जमिनीवर अवैध व बेकायदेशीररित्या तसेच पदाचा गैरवापर करून आर्थिक फायदा व्हावा म्हणून अतिक्रमण करून सतत उत्पन्न घेत आहेत, असा किशोर पाटील यांनी आरोप केला होता. सदर जमीनीचे वापराबाबत ग्रामपंचायतीकडुन कोणताही भाडेपट्टा करारनामा अथवा शासकीय जमीन वापराबाबतची परवानगी घेतलेली नाही. तसेच महसुल विभागाची देखील कोणतीही परवानगी न घेता तसेच सरकारी जमीन वापरत असल्याबाबत कोणताही महसुल भरणा केलेला नाही, असेही तक्रारदार यांचे म्हणणे होते. म्हणुन तक्रारदार किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केलेला होता. अपिलार्थी, किशोर आत्माराम पाटील, रा.फेस, ता. शहादा, जि. नंदुरबार यांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार साकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक ०३ / २०२१ मधील दिनांक १२/०८/२०२२ रोजीचे आदेशाविरुध्द दिनांक १२/०८/२०२२ रोजी अपील दाखल केलेले आहे. त्यावर अपर आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांच्या समोर 5 जून 2023 रोजी कामकाज चालले. अपिलार्थी, किशोर आत्माराम पाटील, रा.फेस यांच्या वतीने एडवोकेट राहुल कुवर पाटील यांनी युक्तिवाद केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या अशाच एका खटल्यातील निकालाचा आधार यासाठी घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालय यांनी त्या प्रकरणात एखादया ग्रामपंचायत सदस्याने अगर त्या सदस्याचे कुंटुबातील सदस्यांनी सरकारी जागेवर निवडुन येण्याचे पुर्वीच्या काळात अतिक्रमण करून कब्जा केलेला असेल आणि सदरचे अतिक्रमण धारक सदस्य व त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी निवडणुकीपावेतो व निवडणुकी नंतर सुध्दा अतिक्रमीत क्षेत्र कब्जात कायम ठेवले असेल तरी सदरचे अतिक्रमणामुळे त्या कारणामुळे सदस्य हा निवड झालेल्या पदासाठी अपात्र ठरेल, असा निकाल असतांना फेस ग्रामपंचायतच्या या अतिक्रमण विषयक प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कानाडोळा केला जात होता. हे सर्व युक्तिवाद लक्षात घेऊन अप्पर आयुक्त यांनी वरील निकाल दिला.

असा आहे आदेश

आदेशात म्हटलंय की

१. अपीलार्थी यांचे अपील मान्य करण्यात येत आहे.

२. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचेकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक ०३ / २०२१ मध्ये दिनांक २९/०७/२०२२ रोजी पारित केलेला आदेश रद्द करण्यात येत आहे.

३. सामनेवाले क्र. १ ते ३ यांना ग्रामपंचायत फेस येथील सदस्य पदावर पुढे चालु राहण्यासाठी अपात्र / अनर्ह ठरविण्यात येत आहे.

४. खर्चाबाबत आदेश नाहीत. सदरचा निर्णय सर्व संबंधितांना स्वतंत्ररित्या कळविणेत यावा.

५. संचिका बंद करण्यात येऊन अभिलेख कक्षात पाठविण्यात यावी.

६. सदर निर्णय www.eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!