अत्यंत अफलातून !.. धावत्या ट्रकमधून चोरी करण्यासाठी हॉलिवूड स्टाईलने ते समांतर पळवायचे दुसरी ट्रक

मुंबई – धावत्या ट्रकमधून चोरी केल्याप्रकरणी दोन बहाद्दरांना भंडारा येथील एलसीबी पथकाने हुडकून काढले आणि थेट राजस्थानात जाऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. परंतु त्यांची चोरीची पद्धत ऐकल्यावर स्वत: पोलीस अधिकारी देखील चक्रावून गेले. महामार्गावर एका धावत्या ट्रकवरून दुसऱ्या  धावत्या ट्रकवर उडी मारायची आणि सामान चोरी करून तसेच धावत्या ट्रकवर उडी मारून परत यायचे; अशी अफलातून हॉलिवूड स्टाईल हे दोन्ही जण वापरत होते व त्यामुळे पोलिसांच्या हाती लागत नव्हते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थोडक्यात हकीकत अशी की,  दि. 05/01/2021 रोजी पोलीस स्टेशन कारधा येथे धावत्या ट्रकमधून साहित्य चोरी करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक जयवंत चव्हान यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करून सहायक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, पो, हवालदार नितीन महाजन, पोलीस अमलदार मंगेश माळोदे गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेशीत केले. गुन्ह्यातील आरोपीचा सतत दहा महिने पाठलाग करुनही कोणतीही सकारात्मक बाब हाती लागत नव्हती. आरोपी हे कुशाग्र बुध्दीचे असल्याने ते कोणत्याही प्रकारच्या तांत्रीक वस्तुचा वापर करीत नाहित, असे आढळून आले. यामुळे या गुन्हेगाराना शोधणे हे ढिगाऱ्यात सुई शोधण्याइतपत कठीण झाले होते. परंतु स. पो. नि. नितीनचंद्र राजकुमार, पो. हवा. नितीन महाजन, पो. अम. मंगेश माळोदे यांनी पेरलेल्या गुप्तहेरांनी संशयित आरोपी वाल विष्णाराम चौधरी हा राजस्थानातील त्याच्या गावी रहायला आल्याची  माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता स. पो. नि. नितीनचंद्र राजकुमार, पो. हवा. नितीन महाजन, पोलीस अमलदार मंगेश माळोदे हे तात्काळ राजस्थान येथे रवाना झाले व त्यास ताब्यात घेवून अधीक चौकशी केली. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, संशयित आरोपी श्रवणलाल विष्णाराम चौधरी व त्याचा साथीदार दिनेश जोगरामजी कुमावत (वय 32) रा. हैदराबाद हे दोघेही भाड्याच्या घरात रहातात. दिनेश कुमावत याच्या नावाने श्रवणलाल चौधरी याने आयशर ट्रक खरेदी केला असून त्याच ट्रकने ते महाराष्ट्र व ईतर राज्यातील महामार्गावर धावत्या ट्रक मधून सिने स्टाईल पध्दतीने साहित्य चोरी करतात; अशी कबुली दिली. नंतर चोरलेले सामान हैदरबाद येथे विक्री करीत असत. त्या करीता चोरट्यांनी ट्रकला खास पद्धतीने समोरुन दोन दरवाज़े बनवले होते. त्यांनी  6 ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यास पोलीस स्टेशन कारघा यांच्या ताब्यात कायदेशीर कारवाई करीता दि. 19/11/2021 रोजी सोपविण्यात आले. सदरचे गुन्हे हे अथक परिश्रम व कौशल्यपूर्ण तपास करून वरील सर्व नमुद पोलीस अधिकारी व अमलदारांनी वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गर्शनाखाली उघडकीस आणले.
‘अशी’ होती चोरीची अफलातून हॉलीवुड स्टाईल

     चोरट्यांनी आयशर ट्रकला दोन खास पद्धतीचे दरवाजे केले होते. महामार्गावर या आयशरमधून धावत्या ट्रकचा ते चक्क पाठलाग करायचे. मग एखाद्या हॉलीवुड सिनेमातील वाटावे अशा पद्धतीने वेग मर्यादा समांतर ठेवून ड्राईव्हर वाहन चालवायचा तर दुसरा चोर चालत्या वाहनामधून कंडक्टर साईडने ट्रकच्या केबीन वर चढायचा. तेथून जिवाची कसलीही पर्वा न करता समोरच्या ट्रकवर उडी मारायचा. त्या ट्रकची तीरपाल खोलून डाल्यात प्रवेश करायचा.  मग तेथील सामान चोरून आपल्या आयशर ट्रक मध्ये फेकायचा. अशा प्रकारे चोरी करून परत आपल्या ट्रकवर उडी मारुन सुरक्षीत परतायचा व पुढे ठरलेल्या मार्गाने हैदराबाद येथे चोरीचा माल विक्री करायचे. आतापर्यंत बॉलिवूड आणि हॉलीवुड चित्रपटांमधून असेे पाहायला मिळाले होते. या बहाद्दरांनी ते प्रत्यक्षात करून दाखवले परंतु आपल्यातील साहस आणि कौशल्य चुकीच्या कारणासाठी वापरल्याने आता तुरुंगात बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!