अध्यात्माचे मर्म – ज्ञानयोग

अध्यात्माचे मर्म -ज्ञानयोग

     हिंदू धर्मग्रंथ वेद, उपनिषदे, पुराणे, दर्शने स्मृती, ऋचा, रामायण, श्रीमद्भगवद्गीता, दासबोध इत्यादींमध्ये आपल्याला आपल्या ऋषी-मुनींनी आचार धर्माचे नियम, आरोग्य, धर्माची महती, वैशिष्ट्ये व ईश्वर प्राप्ती यांचे विस्तृत विवेचन केले आहे. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा घेतला जातो. वेदाला जगातील पहिले साहित्य म्हटले जाते. उपनिषदे म्हणजेच भारतीय तत्वज्ञान विषयक ग्रंथ होय. विश्वात्म्याचे म्हणजेच परब्रह्माचे स्वरूप उपनिषदातून कळते. रामायण श्रीरामाच्या विविध गुणांमधून एका आदर्श व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब मनावर अंकित करते. तर श्रीमद्भगवद्गीता आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगते. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करुन आनंदाने जगण्याची शिकवण आम्हाला श्रीमद्भगवद्गीता देते. दासबोध भक्ती सोबत शक्तीची उपासना सांगत प्रापंचिक ज्ञान आणि पारमार्थिक मार्गाची दिशा सांगतो. हे सर्व धर्म ग्रंथ म्हणजे जीवनाला दिशा देणारे मूळ ज्ञान आहे. स्वतःतील गुण-अवगुण यांची जाणीव करून देऊन सर्वांगीण विकास घडवणारे ज्ञान आहे. ज्ञानयोग म्हणजेच या ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास आणि आचरण करून ईश्वर प्राप्ती करणे होय. सत्ययुगातील हा खरा उपासना मार्ग. पण आजच्या या धकाधकीच्या व वैश्विक स्पर्धेच्या युगात आमची इच्छा असूनही आम्हाला हे सर्व वाचणे व ते आत्मसात करुन त्याप्रमाणे आचरण करणे शक्य नाही. परंतु हे ही तेवढेच खरे की ज्ञान ही अशी एक शक्ती आहे जी आपल्याकडून कुणी कधीच हिरावून घेत नाही व ती सतत वाढत जाणारी व सहजतेने दुसर्‍याला देता येणारी शक्ती आहे जिच्यामुळे सर्वजण एकत्रित येऊन आनंदाने जगतात. सर्वसामान्यांना हे ज्ञान ग्रहण करणे शक्य व्हावे म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज अशा विविध संतांनी त्याला सोप्या भाषेत मांडले आहे. आजही अनेक धार्मिक व अध्यात्मिक संस्था त्यांच्या विविध साहित्य रचनांच्या माध्यमातून हे ज्ञान सोप्या भाषेतून मांडतांना दिसून येतात.  काही संस्थांनी विज्ञानाची सांगड घालून शास्त्रीय भाषेत हे ज्ञान मांडले आहे जे सहज समजते व शास्त्रीय आधारामुळे बुद्धिलाही वाटते ते आत्मसात करून आपल्यातील ज्ञानशक्ती वाढवूया व इतरांनाही ती देऊया. शस्त्रात ज्ञानदान हे सर्वात मोठे पुण्यकर्म सांगितले आहे. अशाप्रकारच्या साहित्याच्या वाचनातून व ते आत्मसात करून ज्ञानयोगाची अनुभूती आपण कलियुगातही घेऊया.

– डॉ० पी. एस. महाजन
   संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!