..अन्यथा नंदुरबारला पाणीकपात अटळ !

 

नंदुरबार- पाऊस पुरेसा झाला नसल्याने यंदा जिल्ह्यातील जलसाठा पन्नास टक्केही झालेला नाही. पावसाचे अखेरचे थोडेच दिवस शिल्लक असून या दिवसात काही भर पडली नाही तर गुरा-ढोरांच्या चारा-पाण्यासह माणसांनाही पाण्याची वानवा भासण्याची शक्यता आकडेवारीवरुन दिसू लागली आहे. त्याच बरोबर नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणार्‍या विरचक धरणानेही पुरेशी पातळी गाठलेली नाही. अशात शहरवासियांनी बेफिकीर राहून पाण्याची नासाडी चालू ठेवल्यास नंदुरबार नगरपालिकेवर पाणीकपातीचा प्रसंग येऊ शकतो; याचे संकेत आतापासून दिले जात आहेत.
मध्यम प्रकल्पांपैकी विरचेक येथील शिवण मध्यम प्रकल्पातून नंदुरबार शहराला व मुख्यालयाला पाणी पुरवठा केला जातो. यंदा या प्रकल्पात पाण्याची आवक झाली नसल्यामुळे फक्त ८.२३ द.ल.घ.मी पाणी साठा उपलब्ध आहे, त्यापैकी वर्षभरासाठी ४.५० द.ल.घ.मी. पाणी नंदुरबार शहराला पुरवठा करावा लागतो. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ८.८० द.ल.घ.मी. पाणी साठ्याची गरज असते. सध्या धरणात फक्त ८.२३ द.ल.घ.मी पाणी साठा उपलब्ध आहे. यामुळे नंदुरबार वासियांच्या चिंतेत वाढ होणार, हे यावरुन स्पष्ट दिसत आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, हाच यावर महत्वाचा पर्याय आहे. त्या बरोबरच नगरपालिकेने पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. टाकी भरून जाते तरी टेरेसवरून पाणी वाहू देणारे महाभाग या नियोजनाला मारक ठरणार आहेत. टेरेसवरुन पाणी वाहिस्तोवर नळ आणि वीजमोटर चालू ठेवणारे नागरिक वीजेची तसेच पाण्याची अनावश्यक नासाडी करीत असतात. अशा नागरिकांना वठणीवर आणणारे नियोजन पालिकेला कठोरपणे राबवणे अत्यावश्यक होणार आहे.

     याबबत एनडीबी न्यूज वर्ल्डशी बोलतांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, नर्मदा आणि तापी नदी वगळता अनेक नद्या आजही पहिल्या पुराच्या प्रतीक्षेत आहेत. नदी, नाले अजूनही प्रवाहित झालेले नाहीत. त्यामुळे धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. कमी पर्जन्यमानामुळे शेती पिकांची स्थिती दयनीय आहे. पुढील पंधरा दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास पिण्याचे पाणी व शेती सिंचनासाठी दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यामुळे प्रसंग पडल्यास शहरवासियांना एक दिवसाआड पाणी देण्याऐवजी दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय नगरपालिकेला करावा लागू शकतो. तथापि प्रत्येक नागरिकाने पाणी जपून वापरण्याला प्राधान्य द्यावे आणि भविष्यात पाण्याचे संकट उदभवणार नाही; याची दक्षता घ्यावी, हे आमचे कळकळीचे आवाहन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!