नंदुरबार – अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कन्नड पर्यंत मागोवा घेत अवघ्या २४ तासात त्या मुलीची सुटका करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार शहर पोलीसांनी ही कामगिरी बजावली आहे. मोबाईल मेसेज आणि सोशल मीडियाचा आधार या तपासात महत्त्वाचे ठरले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोरखनाथ नाईक रा. व्याहूर ता.जि. नंदुरबार यांनी फिर्याद दिली होती. त्यात म्हटले होते की, अल्पवयीन मुलगी दिनांक 6/12/2021 रोजी सकाळी 7.30 वा. सुमारास जी.टी.पी. कॉलेजमध्ये गेली परंतु ती दुपार पर्यंत घरी आली नाही. नातेवाईकांसमवेत तिचा सर्वत्र शोधूनही कुठे आढळली नाही. दरम्यान, नांदरखेडा ता. जि. नंदुरबार येथील महेश रसाल राठोड याने लग्नाचे अमिष दाखवून मोटार सायकलवर तिला पळवून नेल्याची माहिती समोर आली. म्हणून तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी व अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी गांभीर्य लक्षात घेत मार्गदर्शन व सुचना देवून आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ पथकास धुळे, चाळीसगांव, औरंगाबाद येथे रवाना केले. समाज माध्यमांवर देखील आरोपीचा फोटो व त्याबाबतची माहिती प्रसारीत करण्यात आली होती. दिनांक 6/12/2021 रोजी रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या वडिलांना अनोळखी मोबाईल नंबरवरुन मॅसेजद्वारे समजले की, त्यांच्या मुलीस तिच्या इच्छे विरुध्द् महेश राठोड याने औरंगाबाद जवळील एका ठिकाणी नेलले आहे. तथापि आरोपी वारंवार आपले लपण्याचे ठिकाण बदलवत होता त्यामुळे तपास पथकास शोध घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. तपास पथकाने कन्नड शहरामध्ये आरोपीचे कोणी नातेवाईक राहतात का ? याबाबत माहिती घेतली असता प्रमुख धागा सापडला. दिनांक 7/12/2021 रोजी पहाटे 5 वा.च्या सुमारास कन्नड शहरातील औरंगजेब नगरातील आरोपीच्या नातेवाईकाकडे पथकाने तपासणी केली आणि अखेर त्या घरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. आरोपी महेश रसाल राठोड वय 21 रा. नांदरखेडा ता.जि. नंदुरबार यालाही ताब्यात घेण्यात आले.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अभिनंदन करुन पथकास विशेष रोख बक्षीस जाहीर केले. तसेच अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी सुखरुप सुटका केल्याबद्दल नंदुरबार पोलिसांचे आभार व्यक्त केले. ही कामगिरी पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उप निरीक्षक सागर आहेर, पोलीस नाईक स्वप्नील गोसावी, पोलीस अमंलदार दिनेश चव्हाण, महिला पोलीस अमंलदार शुभांगी पाटील, पोलीस नाईक मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.