काबुल (अफगाणिस्तान) – पाकिस्ताननेच तालिबानला जन्माला घातले असा दावा अफगाणच्या माजी राजदूत महमूद सैकल यांनी केला आहे. एवढेच नाही तर भारताला रोखण्यासाठी पाकने तालिबानला जन्माला घातले, असेही ट्वीट माजी अफगाणी राजदूत महमूद सैकल यांनी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांच्या हवाल्याने केले आहे. महमूद सैकल हे संयुक्त राष्ट्रे आणि ऑस्ट्रेलिया येथे अफगाणिस्तानचे राजदूत होते.
सैकल यांच्या म्हणण्यानुसार इस्लामिक स्टेट खुरासान, तालिबान आणि अल् कायदा यांचे चांगले संबंध आहेत, असे अमेरिकेच्याच एका अहवालात म्हटले आहे. अल् कायदाचे नेते अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील भागात रहात आहेत. अल् कायदाचे आतंकवादी मोठ्या संख्येने तालिबानसमवेत अफगाणिस्तानमध्ये रहात आहेत.