वाचकांचं मत :
अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि भारतियांची बुद्धीमत्ता
भारतीय शिक्षण व्यवस्था, सामाजिक धोरणे व त्याचा परिणाम जनमनावर होऊन समाजाची झालेली मानसिकता तसेच परदेशात काम करण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध असल्याने आणि अधिक पैसे मिळण्याच्या मानसिकतेने सुशिक्षित व कुशल तंत्रज्ञ लोकांनी केलेले स्थलांतर (ब्रेनड्रेन) सतत पहावयास मिळते. याचा फायदा परकीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यास होतो. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथील तंत्रज्ञानाशी संबंधित अस्थापनाच्या प्रमुख पदी भारतीय दिसून येतात.
‘गूगल’चे मूळ आस्थापन ‘अल्फाबेट’चे सुंदर पिचई, ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नडेला, ‘आयबीएम्’ आस्थापनाचे अरविंद कृष्णा, ‘अडोब’चे शंतनू नारायण ही भारतीय नावे तंत्रज्ञानाच्या जगतामध्ये महत्त्वपूर्ण मानली जातात. या आधीही ‘सिटी बँक’ या जागतिक अधिकोषाच्या प्रमुखपदी राहिलेले मूळचे पुण्यातील विक्रम पंडित, ‘पेप्सी को’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी, ‘मास्टरकार्ड’ या ‘डिजिटल पेमेंट्स’शी संबंधित आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बांगा या भारतियांची नावे प्रामुख्याने घेता येतील.
ट्विटरच्या पराग अग्रवाल यांच्या उदाहरणामुळे भारतियांची बुद्धीमत्ता आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये ती निभावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका, हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. अर्थात याचा भारताला प्रत्यक्ष तर नाहीच; परंतु अप्रत्यक्ष लाभही झाल्याचे दिसून आलेले नाही.
आज सर्व धोरणे ही आर्थिक दृष्टीतून आखली जातात. चीननंतर आज भारत हा सर्वांत मोठी बाजारपेठ आणि प्रचंड मनुष्यबळाचा देश म्हणून उदयाला आला आहे.
एखाद्या जागतिक आस्थापनाने त्याचा व्यवसाय भारतात वाढविला किंवा भारताच्या हिताचे निर्णय घेतले तर जगातील मोठी बाजारपेठ म्हणून आस्थापनाला त्याचा फायदा होणारच आहे त्याबरोबरच आपल्या देशालाही त्याचा फायदा निश्चितच होईल. आज राष्ट्र प्रेमापेक्षा कार्पोरेट प्रोफेशनलिझम मोठे झालेले दिसून येते व याची मुळे कुठे तरी आमच्या शिक्षण व्यवस्थेत रुजलेली आहे का? असा प्रश्न पडतो. आमच्या शिक्षण पद्धतीत नैतिकता व राष्ट्रप्रेमापेक्षा भौतिकतावादावर जास्त भर दिसून येतो. विद्वत्ता ही त्यातून मिळणाऱ्या बौद्धिक सुखा पुरती मर्यादित आहे त्याचा देशाला व देशाच्या अर्थव्यवस्थेला किती लाभ होतो त्याचा विचार केल्या जात नाही. या पार्श्वभूमीवर इस्रायल या इवल्याशा ज्यू देशाचा विचार करता येईल. आज इस्रायलचा धर्म, त्याचे भू-राजकीय महत्त्व आणि अमेरिकेला मध्यपूर्वेमध्ये त्यामुळे होत असलेला लाभ एवढेच नाही, तर अमेरिकी आस्थापनांमध्ये ज्यू लोकांचे असलेले वर्चस्व हे अमेरिकेला इस्रायलला पूरक अशी जागतिक धोरणे आखण्यास भाग पाडते. त्या तुलनेत भारत पुष्कळ मागे आहे, हे कटू सत्य आपल्याला या निमित्ताने स्वीकारावे लागेल.
आता पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवनियुक्त प्रमुख झाले असल्याने अनेक भारतियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. शस्त्रापेक्षा अनेक वेळा शास्त्र म्हणजेच विचारांचे युद्ध अधिक प्रभावशाली असतांना ट्विटरचे नवयुग भारताला पूरक होण्यासाठी शेवटी संघटन आणि भारतियांमध्ये वैचारिक क्रांतीची मशाल पेटवणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायला हवे !
– डॉ० पी. एस. महाजन, संभाजीनगर