‘अवकाळी’ संकटात पेरणी करावी कधी? शेतकऱ्यांना मार्गदर्शन द्या: पालकमंत्री डॉ.गावित यांचे निर्देश

नंदुरबार – यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसाच्या पार्श्वभुमीवर बियाण्यांची गुणवत्ता व पेरणीयोग्य कालावधी समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदूरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.

ते आज जिल्ह्याच्या 2023 च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी तसेच कृषीसह विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

अवकाळी पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सुमारे 8 कोटी 56 लाख 87 हजार इतका निधी शासनाकडून मंजूर झाला असून तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ वितरित करण्याच्या सूचनाही यावेळी डॉ. गावित यांनी केल्या आहेत.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, खाजगी, स्थानिक ग्रामीण बॅंका यांनी दिलेल्या लक्षांकाप्रमाणे कर्ज वितरण करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील ठिबक सिंचनाबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. नॅनो युरियाच्या वापर करून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक नायट्रोजनची गरज लक्षात घेवून पिकांच्या खतांची गरज पूर्ण करता येते. त्यामुळे युरिया खताची बचत करून जमिनीवर विपरीत परिणाम न होवू देता इतर सरळ व मिश्र खतांचा वापर वाढविता येतो, त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ झाल्याची उदाहरणे असल्याचे सांगून डॉ. गावित यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना पिकांच्या कापणी प्रयोगाच्या आधारावर मिळणारी पिक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

*या विषयांचा घेतला आढावा*
बैठकीत मागील बैठकीतील सूचनांचे अनुपालन, जिल्ह्याची सर्वसाधारण भौगोलिक परिस्थिती, मागील पाच वर्षातील जिल्ह्यातील तालुका व महिनानिहाय पर्जन्यमान, मागील वर्षातील कृषी उत्पन्न बियाण्यांची प्रत्यक्ष उपलब्धता व चालू खरीप हंगामासाठीचे नियोजन, खत पुरवठा, कीटक नाशके व औजारे, गुणवत्ता नियंत्रण, कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महत्वाच्या योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना, मुलस्थानी जलसंधारण, बिजप्रक्रिया, मिश्रपिक पद्धती, व इतर तंत्रज्ञान, संभाव्य पर्जन्यमानासंदर्भात करावयाच्या उपाययोजना, नैसर्गिक आपत्ती, चारा उपलब्धता, सहकारी संस्था, कृषी पतपुरवठा, कृषी पंपांसाठी विज जोडणी व डिझेल नियोजन पाणी वापर संस्थांची सद्यस्थिती या विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!