अवश्य वाचा नेत्यांच्या गीत गायनाचा (कल्पनिक) वृत्तान्त.. बुरा न मानो होली हैं |..

बुरा न मानो होली हैं |..

मित्रहो, होळी रंगपंचमी आणि धुळवड म्हटली की, एकमेकाला दिलखुलास भेटणं, रंग लावून आनंद लुटणं आलंच. ज्याच्याबद्दल मनात राग आहे त्या व्यक्तीला किंवा ज्याच्याबद्दल प्रेम आहे त्या व्यक्तीलाही रंग चोपडत मजेदार रुप देण्याचा आनंद लुटण्याची अनोखी ही प्रथा आहे.

याला अनुषंगूनच मग आपल्या नंदनगरीतील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बुरा न मानों होली हैं कार्यक्रम आयोजित करण्याचा घाट घातला. नाट्यप्रेमी नागसेन पेंढारकर आणि पत्रकार रणजित राजपूत यात आघाडीवर होते. पक्षभेद विसरून शहरातील सर्व नेत्यांना एकत्र यायला भाग पाडायचे आणि त्यांच्या उपस्थितीत झकास कार्यक्रम रंगवायचा, हे त्यांनी ठरवलं. झकासपणा वाटावा म्हणून मग “नेत्यांचे गीत गायन” जोडीला ठेवले. छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात शानदार आयोजन केले..  नागसेन पेंढारकर, रणजित राजपूत अदबीने स्वागताला उभे राहिले..कार्यक्रमाची वेळ झाल्यावर क्रमाने एकेक नेता, कार्यकर्ता, पदाधिकारी, नगरसेवक, मान्यवर नागरिक हजर व्हायला लागले.. उपस्थिती बऱ्यापैकी पाहून पेंढारकर बरेच सुखावले.. तोपर्यंत माजी आमदार भैय्यासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी ईकडे गेटवर सौ.रत्नाजी भाभींसह हजर झाले. मागे हात बांधून सर्व व्यवस्थेचा मुआयना करत करत ते आपल्या खुर्चीच्या दिशेने चालू लागले. तेवढ्यात अचानक डीजेवरून भैय्यांचं जोरदार गाणं वाजायला लागलं.. “मदतीचा हात चंदू भैय्या..जीवाची साथ चंदूभैय्या..”
न राहवून प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे, दीपकभाऊ दीघे यांनी त्यावर तत्काळ ठेका धरला.. पण तो दणदणाट ऐकताच उपस्थितांप्रमाणे स्वत: भैय्याही बिचकले. हात वर करून लगेच त्यांनी खास शैलीत ते थांबवायची सूचना केली, “ए बंद करोरे..कोण आहे रे बेटा तिकडे.. थांबव बरं”.. मग रणजितकडे पाहून मिश्किलपणे म्हणाले, “गडबड करू नको. जरा सांभाळून घे जो बाबा.. कार्यक्रम सगळ्यांचा आहे. नाहीतर तुझ्यामुळे काही लोक मला ऐकवतील. म्हणतील, नाट्य मंदिरालाच आमदार कार्यालय बनवून टाकलं का?”… तोवर नागसेनने जाऊन लगबगीनं लगेच ते गाणं बंद केलं.. “आमशादादा तुमचा तिरकामठा खाली ठेवा आणि बसा, विकीबाबा तुम्हीपण असे साईडला बसा”, अशा सूचना करत भैय्या स्थानापन्न झाले. तेव्हा विजय पराडकेंच्या गालावर खळी उमटली होती.
..काही वेळाने चंदूभैय्या उपस्थितांना झालेला शहरविकास सांगण्यात गढून गेले. यंदा सगळीकडे आपलाच भगवा दिसला पाहिजे. आपण पाणी पाजूनच राहू. नळ आणि तोती घेऊन पालिका तयारीतच आहे, असा शेरा मारायलाही ते विसरले नाही.. मग आयोजकांमधून कोणीतरी त्यांना गाणं म्हणावं अशी फर्माईश केली.. जोरदार शिटी ठोकून दीपक दीघेंनी तेव्हा एक फलक झळकवला. त्या फलकावर लिहिलेलं होतं, “भैय्या आमचे दमदार, बनतील लवकर आमदार”.. चंदूभैय्यांनी माईक हातात घेतला आणि लगेच गायला सुरुवात केली. “सांसोकी जरुरत हैं जैसे, जिंदगी के लिए.. हां एक सनम चांहिए आशिकी के लिए, बस एक सनम चांहिए आशिकी के लिए..” भैय्यासाहेब अचानक असलं ‘आशिकी’चं गाणं गाताहेत म्हटल्यावर अनेकजण चक्रावले. शंका येऊन सौ.भाभींनीही पटकन भोवताली नजर फिरवली. तेव्हा दीघेंच्या हातातील आमदार होणार सांगणार्‍या फलकाकडे पाहून चंदुभैय्या गाणं गात असल्याचं त्यांना लक्षात आलं.. भाभींनी तेव्हा सुस्कारा सोडला.. उपस्थितांनी त्यांचे चिरंजीव ऍड.राम रघुवंशी यांनाही गाणं गायला भाग पाडलं. त्यांच्या वयाला साजेसं उत्साहात येत त्यांनीही झटदिशी गायला सुरुवात केली, “मेरा चांद मुझें आया हैं नजर, ऐ रात जरा थम थम के गुजर, छाया हैं नशा मेरी आंखोंपर, ऐं रात जरा थम थम के गुजर…”
तो पर्यंत माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित यांचं आगमन झालं. अर्थातच भाजपाच्या खासदार डॉ.हीना गावित आणि पंचायतसमिती सदस्या डॉ.सुप्रिया गावित याही त्यांच्या आजूबाजूला होत्या. शुभेच्छा देत देत रंगाचे टीके लावत आपल्या आसनापर्यंत ते गेले तोवर त्यांच्याकडच्या डबीतील रंग संपला होता. चंदूभैय्या लगेच म्हणाले, हरकत नाही. आम्हाला राऊत साहेबांनी पुरेसा भगवा गुलाल पाठवला आहे, असे म्हणत डॉ.गावित यांना भगवा टिका लावून मग चंदूभैय्यांनी भगवा स्कार्फही त्यांच्या गळ्यात घातला. त्यानंतर लोकसभेत मांडलेल्या प्रश्‍नांची जंत्री उपस्थितांना खासदार डॉ.हिना गावितांनी ऐकवली. आता आपण बांबू लागवडीवर भर दिला असल्याचे हिना गावितांनी म्हणताच उपस्थित काही करदात्यांनी म्हणजे टॅक्स पेयर्सनी पटकन आपल्या मोडून गळ्यात पडलेल्या हाताकडे पाहिले. बांबू लागवडीचा निराळाच अर्थ लावला असावा. दरम्यान, ईकडे नगरसेवक प्रशांत चौधरी हे गटनेते चारुदत्त कळवणकरांच्या कानात कुजबुजले, “या मॅडम पाहिजे तिथे बांबू लावत नाहियेत त्याचं काय?..”  त्यावर चारुदत्तांचा चेहेरा मात्र निर्विकार होता. आयोजकांनी लगेच डॉ. विजयकुमार गावित साहेबांना गाणे म्हणण्याची फर्माईश केली. आढेवेढे न घेता माईक हातात घेऊन ते पटकन गायला लागले, “आँख हैं भरी भरी और तुम मुस्कराने की बात करते हों, जिंदगी हैं खफा खफा और तुम ‘फुल खिलाने’ की बात करते हों….” मधेच डॉ.सुप्रिया यांनी दुरुस्त केले, “पप्पा, ते शब्द ‘फुल खिलाने की’ असे नाही तर, ‘दिल लगाने की’ असे आहेत…”  त्यांचं ते गाणं पुर्ण होताच उपस्थितांनी डॉ.हिना यांनाही गाण्याचा आग्रह केला. जेमतेम तयार होत त्यांनी माईक हातात घेतला. त्या गाणार तेवढ्यात, डीजेवर परस्पर चुकून वेगळच गाणं वाजायला लागलं.. “गझलमें बहते हुंए ‘फुल’ चुम लिए वरना, गमों में डुबके हम लोग मर गए होते..”
 त्यावर ताल धरत माजी उपनगराध्यक्ष परवेज खान डोलायलाच लागले. पण कुणीतरी धावत जाऊन ते बंद केलं. परवेजभाई लगेच म्हणाले, “अरे, बजने दो नां भाई..अल्ताफ राजा के गाने बहोत भारी होते हैं,…”
    इकडे मुड ऑफ झाल्याने हिना गावितांनी गाणं न गाताच माईक पटकून दिला.. आयोजकांनी मग राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांना गळ घातली. त्यांनी पटकन मान ठेवत शम्मी कपूर स्टाईलने सुर पकडला. “बंदा परबर थामलो जिगर, बनके प्यार फिर आया हूँ, खिदमतमें आपके हुजूर, फिर वही दिल लाया हूँ..” कधी पवारसाहेबांच्या तसबीरीकडे तर कधी या उपस्थित मान्यवरांकडे बघत ते गात होते. त्यांचं गाणं संपता संपता भैय्या आणि डॉ.गावित मात्र गोंधळलेले दिसले. नेमकं कोणाला उद्देशून गायले ते त्यांना बहुधा कळले नाही.
तेवढ्यात अचानकच चौफेर गुलाल उधळत तरुणांच्या एका मोठठ्या जमावाने सिनेस्टाईल एन्ट्री घेतली. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा एक भरदार आवाज कानात दुमदुमला.. “आली रे आली मस्तानोंकी टोली तुफान दिलमें लिए, जखमी दिलोंका बदला चुकानें, आये हैं दिवाने दिवाने..” हे रंगपंचमीचं सदाबहार गाणं गात गुलालाच्या धुराळ्यातून माजी आमदार शिरीशदादा चौधरी थेट अवतीर्ण झाले. अशा एन्ट्रीमुळे क्षणात माहोल पलटून गेला.. आपल्याकडे निळा हिरवा भगवा सगळे रंग आहेत असं सांगून ते प्रत्येकाला आदराने टीका लावू लागले.
ईकडे आकाश चौधरी, गौरव चौधरी चारुभाऊंकडे धावत आले. कानाशी लागून म्हणाले, “भाऊ, शिरिषदादांना मेन बात करायला लावा हो.. हाच मोका आहे नं?..” चारुभाऊने त्यावर काहीच न बोलता त्या प्रत्येकाच्या हातात मुठ-मुठ रंगमाती दिली आणि म्हणाले, “उडवत रहा रे…”
 ईतक्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजूभाऊ चौधरी यांचंही आगमन झालं. या नगरसेवकांसह काही तरुण विजूभाऊंच्या दिशेने पळाले आणि मोठ्या आशेने सांगू लागले, “भाऊ तुम्ही तरी जाहीर करा, …यंदा पुढे काय करणार ते सांगा.. लाऊन द्या मौके पे चौका..” विजूभाऊ मात्र प्रत्येकाला गुलालटिका लावत लावत “काय, कसे बरे आहात ना?” असं विचारत पुढे निघून गेले.. माईक हातात घेऊन “भ्रष्टाचार्‍यांना नागडं केल्या शिवाय थांबणार नाही,” असे सांगत धो धो बोलायला लागले. मग बराच वेळाने कुणीतरी त्यांना मधेच अडवून सांगितलं “भाऊ तुम्ही तर भाजपाचं प्रगतीपुस्तकच केव्हापासून मांडताहेत.. गाणं म्हणा ना?” तेवढ्यात एकाने सुचवले, “भाऊ या चिमण्यांनो परत फिरा रे घरट्याकडे आपुल्या.., हे गाणं म्हणा. कारण एकानेही मराठी गाणं म्हटले नाही. तुम्ही हेच गाणं म्हणा.. ही ‘पांचट’ फर्माईश देणारा कोण आहे, अशा अर्थाने पहात संतप्त विजूभाऊंनी माईक पटकून दिला.. तितक्यात प्रचंड गुलाल माती उधळण करत आणखी एक जमाव घुसून आला. “तीन पट्टीवाला गोविंदा आला, उपर लटकके निचे पटकके लुट लो माल मसाला..” असं जोरदार गाणं वाजत राहिलं. मग त्या धुरळ्यातून विशेष स्टाईलने उद्योजक डॉ.बापूसाहेब रविंद्र चौधरी समोर आले. हास्यवदनाने सगळ्यांना आदराचा नमस्कार करत आसनस्थ झाले. तेव्हा “रविबापूंचा दणका, सगळ्यांचा भनका..” अशी एका उत्साही कार्यकर्त्याने जोरदार घोषणा दिली. डॉ.गावित यांनी पटकन माईक ताब्यात घेत त्याला थांबवला आणि सांगितलं, “अरे ऐकानां..आपलं ठरलंय ना? आता फक्त गाणं म्हणा..” मग रविबापूंनी त्यांच्यावतीने चारुभाऊंना गाणं गायला सांगितले. चारूभाऊ माईक घेऊन लगेच अमिताभचं ते फेमस गाणं गावू लागतात, “मेरे पास आओ मेरे दोसतो एक किस्सा सुनों, कई साल पहले की ये बात हैं, बडी अंधेरी घनियारीसी रात हैं…” त्यांचं ते गाणं ऐकता ऐकता मोहनभाऊ खानवाणी, कमल ठाकूर आणि अन्य कधी चंदूभैय्यांकडे तर कधी हिनाताईंकडे कधी प्रश्नार्थक कधी संशयाने पहात राहिले….
– योगेंद्र जोशी, नंदुरबार.
(टीप: वाचकांनी कृपया नोंद घ्यावी की येथे मजकुरात घेतलेली मान्यवरांची नावं वास्तव असली तरी नमूद घटना, प्रसंग आणि त्यातील संवादांसह हा संपूर्ण मजकूर काल्पनिक आहे. कोणाचाही उपमर्द करण्याचा यात हेतू नसून केवळ विनोद निर्मितीचाच हेतू आहे. तथापि कोणाचे मन अनावधानाने दुखावले असल्यास जाहीर क्षमा मागतो.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!