नंदुरबार – दंगलीच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, अपघात प्रवण मार्गांवरील वाहतूक नियंत्रित करणे, तस्करांना आळा घालणे अशा उपयोजनात्मक कामांना प्राधान्य देऊ. सोबतच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सुविधा प्राप्त करून देण्यासाठी तसेच पोलीस ठाण्यांची स्थिती अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्नशील राहू; असे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षकपदावरून महेंद्र पंडित यांची मुंबई पोलीस उपाध्यक्षपदी बढतीवर बदली झाली. त्यामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पदी कोल्हापूर परिक्षेत्रातून पी.आर. पाटील हे बदलून आले आहेत. मुंबई उपायुक्त महेंद्र पंडित यांच्या हातून त्यांनी नुकतीच जिल्हा अधिक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार व गृह उपाधीक्षक सचिन हिरे याप्रसंगी उपस्थित होते.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात ते म्हणाले की, तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागात वाढलेली गुन्हेगारी, तस्करी असो की शहरी ग्रामीण भागात चाललेले गैरप्रकार असो कशाचीही गय केली जाणार नाही. दंगल घडवणार्या असामाजिक तत्वांना खपवून घेणार नाही.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कामगिरी आणि गुन्ह्यांचा तपास लावण्याचा आलेख कौतुकास्पद असल्याचे नमूद करून अधीक्षक पाटील म्हणाले की चांगली कामगिरी बजावणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देणाऱ्या बक्षीस योजना विचाराधीन आहेत. त्यावर यथावकाश निर्णय घेऊ. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आणि पोलीस ठाण्यांना ज्या समस्या आहेत त्याची सोडवणूक अभ्यास होईल त्यानुसार वरिष्ठांच्या मदतीने केली जाईल. तथापि भविष्यात काय करणार, कोणती कारवाई हाती घेणार, वगैरे जाहीरपणे बोलायला मी आलेलो नाही. बोलण्यापेक्षा आधी काम करून दाखवू; असेही जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील म्हणाले.
