असे आहे गौडबंगाल ! पकडायचे बायोडिझेल दाखवायचे केमिकल; माफियाला मिळतात पुरवठा विभागातून पळवाटा ?

नंदुरबार-  अवैध विक्री करून शासनाचा कर बुडवणाऱ्या बायोडिझेल माफियाला महसूल व पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारीच कारवाईतल्या पळवाटा सांगून व सॅम्पल मॅनेज करण्यासारखे मार्ग दाखवून स्वतःचे खिसे भरत आहेत व यंत्रणेतील जबाबदार अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे; असा आरोप करीत प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बिपीन पाटील यांनी आज चौकशीची मागणी केली. एक बायोडिझेल माफिया आणि पुरवठा विभागातीलच एक कर्मचारी यांच्यातील याच मुद्यावरील संवाद असलेली एक कथित ऑडिओ क्लिप त्यांनी पत्रकारांना ऐकवली व हा भक्कम पुरावा हाती असल्याचा दावा केला.
 नंदुरबार येथील विश्रामगृहावर आज दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बिपिन पाटील बोलत होते. अवैध बायोडिझेल विक्री विरोधात होणारी कारवाई निव्वळ फार्स असते का? हा संशय यामुळे बळावला आहे. पळवाटा सांगून व सॅम्पल मॅनेज करण्यासारखे मार्ग दाखवून अधिकाऱ्यांच्यावतीने तडजोड केली जात असल्याचे ऊघड करणारी ही कथित क्लिप जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना दिनांक 10 जानेवारी 2022 रोजी पाठवली असून चौकशीची मागणी केली आहे. परंतु अद्याप त्यावर कारवाई झाली नसल्याचे पाटील म्हणाले. मंत्री छगन भुजबळ व संबंधित विभागाचे आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या भ्रष्टाचाराची तक्रार करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, बिपिन पाटील यांनी प्रहार संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देखील दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्यातील बायो डिझेलच्या विक्री संदर्भात व अवैध मार्गाने शासनाचा कुठलाही परवाना नसताना गेल्या दोन वर्षांपासून विक्री सुरु आहे. अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याविषयी स्वतः जिल्हाधिकारी यांनी आदेश करून सुद्धा जिल्हा पुरवठा शाखा तसेच अक्कलकुवा येथील तहसिलदार यांनी कारवाई टाळून माफियांना पाठबळ देणे सुरू ठेवले आहे. छापा पाडल्याचे दाखवून किरकोळ दोनशे ते पाचशे लिटर बायो डिझेल जमा केले जाते. त्यानंतर अवैध धंदे करणाऱ्यांकडून मोठा साठा इतरत्र हलविला जातो. या सर्व प्रकरणात महसुल यंत्रणेतील तहसिलदारांपासून जिल्हा पुरवठा शाखेतील अनेक लोक सहभागी होवून स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत. असेच एक प्रकरण सोमवार दि. ३ जानेवारी २०२२ रोजी अक्कलकुवा येथे कडवामहू फाट्यावर घडले असून संबंधित अक्कलकुवा येथील तहसिलदार यांनी आज चार दिवस उलटूनही ज्या ठिकाणी छापा टाकला होता, तेथे कुठलाही मुद्देमाल जप्त केलेला नाही. संबंधित अवैधधंदेवाल्यांकडून लाखोच्या स्वरुपात आर्थिक व्यवहार करुन माल सोडून देण्यात आला असून हा व्यवहार कसा झाला याची पुरावा दाखल ऑडीओ क्लिप (ध्वनीफित) आपणास मी सदर करीत आहे. तरी शासनाचा महसुल बुडविण्यास जबाबदार असणाऱ्या महसुल शाखेतील झारीतील शुक्राचार्यांवर चौकशी समिती नेमूण किंवा एसीबीद्वारे त्वरीत चौकशी करावी, असे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!