मुंबई : राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका. आंदोलन करायचे तर ते कोरोनाविरुद्ध करा; असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजकीय पक्षांना केले. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ ओळखून कोरोनामुक्त गाव करा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणूंविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री, अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य सर्वश्री, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता यांच्यासह राज्यभरातील डॉक्टर्स, नागरिक आणि या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोना विरुद्धचे जर हे युद्ध आहे असं आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे.
आरोग्य सुविधा मग ते ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी या गोष्टींचे ऑडिट करून घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट
अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची घाई आहे. पण आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद होऊ नयेत याची काळजी घेण्याचीही गरज आहे. ती घेतली नाही तर आपण या कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेरच पडणार नाही. महाराष्ट्राने ज्या वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली तेवढी क्वचितच एखाद्या राज्याने केली असावी. आजही ऑक्सिजनची आपल्याकडे कमी आहे आपण रोज ३ हजार मे.टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. काही यंत्रसामग्री बाहेरून आणावी लागत आहे, त्यात काही वेळ जाणार आहे असे सांगून आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ केली आहे, सव्वा लाख ऑक्सिजन बेड वाढवले म्हणजे आपण या सगळ्या रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकतो का याचा विचार करण्याची आवश्यकताही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.
राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना? याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही, आम्हीही हा विचार करायला हवा. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही जशी महत्त्वाची गोष्ट आहे तशीच ‘माझे गाव माझी जबाबदारी’ ही गोष्ट ही महत्त्वाची आहे ही बाब लक्षात घेऊन गाव कोरोनामुक्त करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वैद्यकीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये साडेचारशेपेक्षा अधिक ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आले असून अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता वाढवत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मुख्य सचिवांनी सांगितले. गरज पडल्यास इतर राज्यांमधून ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वाहतूकव्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही बाहेरून ऑक्सिजन मागविण्याची वेळ येऊ नये यावर भर देण्यात येत असल्याचेही श्री. कुंटे यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या उपचार मानकानुसार औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि हाफ़किनला सूचना दिल्या असून कोविड चाचण्यांची क्षमता प्रतिदिन ३ लाखांवर गेली आहे, त्यात आरटीपीसीआर दोन लाख तर एक लाख ॲटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्यांसठी ४१० शासकीय आणि २०२ खाजगी प्रयोगशाळा कार्यन्वित असून रुग्णांसाठी ४ लाख ८० हजार खाटा वाढविण्यात आल्या आहेत. १ लाख २० हजार ऑक्सिजनयुक्त खाटा, ३६ हजार आयसीयू आणि १४ हजार व्हेंटिलेटर्स बेड्सची तयारी प्रशासनाने केली आहे. राज्यात लसीकरणाची कामगिरी अतिशय उत्तम असून काल एकाच दिवशी १२ लाख लसींच्या मात्रा देऊन देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व उपस्थित फॅमिली डॉक्टरांनी आपल्या रुग्णांची तसेच नागरिकांची योग्य तपासणी करावी आणि त्या अनुषंगाने तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्य सचिव श्री. सीताराम कुंटे यांनी केले.
यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. राज्यातील कोरोना रुग्णांची सुरूवातीची आणि सद्यस्थिती, दैनंदिन चाचण्यांची संख्या, रुग्णवाढीचा दर, लसीकरण, म्युकरमायकोसिस आदींची माहिती देऊन संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी क्षमतेचा वापर करून चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.
‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन परिषदेत डॉ. संजय ओक, , डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, डॉ. सुहास प्रभु, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता यांनी कोविडच्या संदर्भात नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
००००००