आकडेबाजांविरुध्द धडक मोहिम; वीज चोरी प्रकरणी ८ गुन्हे दाखल

नंदुरबार- महाराष्ट्राच्या महावितरण वीज कंपनीने थकबाकीदारांकडील वसुलीसोबतच आकडे टाकून वीज चोरी करणार्‍यांविरोधातही अभियान सुरु केले असून नंदुरबार तालुक्यात एकाच वेळी ८ जणांविरुध्द आकडे टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हे नोंद झाले आहेत. या आठही जणांनी ८५ हजार रुपयांची वीज चोरी केल्यााचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.
अधिक वत्त असे की, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जळगाव परिमंडलात सुमारे ९ लाख ९६ हजार १७२ ग्राहकांकडे १ हजार ३४१ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. जळगाव जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार ५७६ ग्राहकांकडे ६३० कोटी ३१ लाख, धुळे जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७५६ ग्राहकांकडे ३८६ कोटी ८० लाख तर नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ८४० ग्राहकांकडे ३२४ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यासाठी ५०० रुपयांहून अधिक बील असलेल्या सर्व ग्राहकांना वीज मंडळाने धारेवर धरले आहे. सुक्यामुळे ओलेही जळते या म्हणीप्रमाणे खरोखर आर्थिक तंगीत असलेल्या सामान्य ग्राहकांवरही गाज पडली असून त्यांच्यासमोर अचानकच हे नवे संकट आले आहे. दरम्यान, वसुलीचा तगादा लावणार्‍या कर्मचारी अधिकार्‍यांना वीजग्राहकांच्या संतापाला तोंड द्यावे लागत असून आकडे टाकून वीज चोरी करणार्‍यांचे काय? हा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे. म्हणूनच आता अधिकार्‍यांनी या दिशेनेही कारवाईचा धडाका सुरु केलेला दिसते.
नंदुरबार तालुक्यातील होळ आणि भोणे शिवारात आकडे टाकून वीज चोरी करणार्‍यांवर धडक कारवाई करण्यात आली. नंदुरबार शहर आणि उपनगर या दोन्ही पोलिसठाण्यात याविषयी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार गुन्हा नोंदवण्यात आलेल्यांची नावे याप्रमाणे- महेंद्र प्रभाकर पाटील, रा. होळ तर्फे हवेली (४ हजार १७० रु.), कैलास सुदाम पाटील, रा. प्लॉट क्र.४०, वाघोदा शिवार, (४ हजार ३१० रु.), रविंद्र सोनू जगताप, रा. होळ तर्फे हवेली शिवार (१२ हजार ४३० रु.), नितीन सोनू जगताप, रा. होळ शिवार (२ हजार ९४४ रु.), भालचंद्र ताराचंद मराठे, रा.भोणे (१३ हजार १७० रु.), विनोद ब्रिजलाल मोरे, रा.भोणे (१९ हजार २६० रु.), माधू धोंडू मराठे, रा.भोणे (२८ हजार ८९० रु.). अशी एकूण ८५ हजार रुपयांची वीज बील आकारणी करण्यात आली असून या आठही जणांविरुध्द महावितरणचे ग्रामीण सहायक अभियंता राजीव रंजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घरी अधिकृत वीज जोडणी न घेता एल.टी कंपनीच्या लाईवर वायरने आकडा टाकून वीज चोरी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!