नंदुरबार – सोशल मीडीयावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले, म्हणून नंदुरबार शहरातील एका युवकावरुद्ध गुन्हा दाखल करीत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने कडक कारवाई केली.
आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या इसमांविरुध्द् भारतीय दंड संहीता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील तसेच सायबर सेलकडून वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येत असते. तरी देखील काही नागरिक काही गोष्टींचे निषेधार्थ किंवा समर्थनार्थ स्टेटस किंवा मजकूर प्रसारित करुन सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस किंवा मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
दरम्यान, नंदुरबार शहरातील भोणे फाटा भागातील एका तरुणाने त्याच्या व्हॉट्सअॅपवर एक आक्षेपार्ह व सार्वजनिक शांतता भंग करणारे स्टेटस ठेवून ते प्रसारीत केले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कठोर प्रतिबंधक कारवाई करणेबाबतचे आदेश दिले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने लगेचच भोणे फाटा भागातील आक्षेपार्ह स्टेटस ठेवून प्रसारित करणाऱ्या इसमास ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याचेविरुध्द कठोर प्रतिबंधक कारवाई केली.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना इशारा देण्यात येतो की, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर किंवा इतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह, सार्वजनिक शांतता भंग करणारे व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर स्टेटस ठेवू नये. तसेच कोणीही कायदा हातात घेवून सार्वजनिक शांतता भंग करु नये, तसे आढळून आल्यास संबंधीतांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून प्रसारीत करण्याचे दिसून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधवा, असेही आवाहन अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.