खास विश्लेषण
(योगेंद्र जोशी)
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धडगांव (अक्राणी) तालुक्यातील धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बु॥ नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 21 डिसेंबर रोजी व मतमोजणी दि.22 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. तत्पूर्वी दि.13 डिसेंबर 2021 या दिवशी झालेल्या माघारी नंतर ही निवडणूक चुरशीची होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे 17, काँग्रेसचे 17, भाजपाचे 14, राष्ट्रवादीचा 1 आणि अपक्ष 2 असे 51 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नगरपंचायत निवडणूक म्हणजे स्थानिक गाव पातळीवर मर्यादीत असलेली राजकीय लढाई, असा अर्थ एरवी लावला जातो. तथापि ईथे काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाच्या बड्या नेत्यांचा तिरंगी सामना रंगला आहे. काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचेेे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ऍडवोकेट के.सी. पाडवी खुद्द यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. तर दुसऱ्या बाजुने शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नगास नग 17 उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिवाय तिसऱ्या बाजूने भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ हिना गावित व भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनीही भाजपाचे स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले आहे. यामुळे धडगाव या अतिदुर्गम छोट्याशा गावातील या निवडणुकीकडे राज्यस्तरीय व्यक्तींचे लक्ष आपसूक वेधले गेले आहे.
धडगाव (अक्राणी) नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतरची ही दुसरी पंचवार्षिक निवडणूक आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून 51 ऊमेदवार रिंगणात आहेत. यात मंत्री के सी पाडवी यांच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हापरिषद सदस्य हारसिंग पावरा व सभापती रतन पाडवी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे 17 ऊमेदवार लढताहेत. के सी पाडवी यांची पारंपारिक मजबूत पकड असून मंत्रिपदाच्या माध्यमातून चाललेली विकास कामे हीच या पॅनलची शक्ती आहे.
यांच्याविरोधात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 17 ऊमेदवार लढताहेत. विजय पराडके हे स्वयंभू नेते असून त्यांनी त्यांची राजकीय पॉवर यापूर्वी सिद्ध केलेली आहे.
तर खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वतीने भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पराडके व निर्मला पावरा यांच्या नेतृत्वात भाजपाचे 14 उमेदवार लढत आहेत. केंद्रीय योजनांचा दुर्गम भागापर्यंत दिलेला लाभ, हा यांच्या प्रचाराचा जणू आत्मा आहे. असे असले तरी धडगावचे मतदार व्यक्ती प्रभावात मतदान करतात आणि विकासाचे मुद्दे फिके पडतात, हे अबाधित सत्य आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचा एकच ऊमेदवार रिंगणात आहे. ही बाब निराळे राजकीय संदर्भ स्पष्ट करून जाते. धडगाव नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर पहिली पंचवार्षिक निवडणूक झाली तेव्हा ज्यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले होते ते विजय पराडके आज शिवसेनेत आहेत व शिवसेनेचे पॅनल लढवत आहेत. राष्ट्रवादीला अद्याप विजय पराडके यांचा पर्याय मिळालेला नाही, ही गोष्ट एका अर्थाने या स्वरूपात अधोरेखित झाली. त्या मागील निवडणुकीत मंत्री के सी पाडवी यांच्या काँग्रेस पॅनेलचे 9 , विजय पराडके यांच्या तत्कालीन राष्ट्रवादी पँनलचे 7 आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. समझोता करून या दोन्ही पॅनलने अडीच-अडीच वर्षे सत्ता विभागून घेतली होती.
जिल्हा परिषदेच्या सत्तेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी महा विकास आघाडीचे सूत्र सांभाळत आघाडी धर्म पाळला. मग या छोट्याशा गावात नेत्यांना का शक्य झाले नाही? नंदुरबारमधली दिलजमाई तिकडे का गळून पडते? हा महत्त्वाचा प्रश्न अनेक जणांकडून उपस्थित केला जातो. त्यावर ‘स्थानिक गणिते निराळी असतात’, असे ठेवणीतले उत्तर संबंधितांकडून दिले जाते. स्थानिक इच्छुक कार्यकर्त्यांच्या गर्दीला आणि त्यांच्या राजकीय इच्छेला बांध घालून नेत्यांनी समझोता लादणे, म्हणजे छुप्या फुटीरवादाला जन्माला घालण्यासारखेच असते. म्हणून कदाचित नेत्यांनी आघाडी ऐवजी सामना पत्करला असावा, असे म्हणता येईल.
परंतु तसेही काँग्रेसचे मंत्री के.सी.पाडवी व शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात राहून राहून मतभेद दर्शवणारे स्पार्किंग होतच असते. नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत व विधान परिषद निवडणूकीत दोन्ही जिल्ह्यांना ते पाहायला मिळाले. त्या पाठोपाठ आता ते पडसाद धडगाव नगरपंचायत निवडणुकीत अशा पद्धतीने उमटत आहे. आणखी एक संदर्भ असा आहे की, मंत्री के सी पाडवी यांच्याकडे जिल्हा कॉंग्रेसचे नेते पद दोन वर्षापूर्वी आले व तेव्हापासून जिल्हा काँग्रेसची पडझड थांबवणे त्यांची जबाबदारी बनली आहे. प्रत्येक निवडणुकीत शक्ती पणाला लावून परफॉर्मन्स दाखवणे त्यांना भाग पडत आहे. त्याच दरम्यान माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे काँग्रेसमधून बाहेर पडले व शिवसेनेत गेले. तेव्हापासून त्यांनीही शिवसेनेची ताकद प्रस्थापित करण्याचे प्रयत्न नव्या जोमाने सुरू केले आहेत. आज धडगाव नगरपंचायतमधे म्हणजे थेट के सी पाडवी यांच्या घरअंगणात शह-काटशहचे राजकारण त्यातूनच रंगले आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश घेण्याआधी जी विधानसभा निवडणूक पार पडली होती, त्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसचे के सी पाडवी यांना जबर लढत दिली होती. अवघ्या काही मतांकरता शिवसेनेच्या हातून ही विधानसभेची जागा गेली आणि के.सी. पाडवी थोडक्यात बचावले. तेव्हापासून काँग्रेसचे के.सी. पाडवी आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांच्यात दरार पडली आहे. तेच के सी पाडवी आज महाराष्ट्र आघाडी सरकारचे मंत्री आहेत तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे कार्याध्यक्ष आहेत. मात्र अक्कलकुवा-धडगाव (अक्राणी) भागातून बसवलेली तेव्हाची ती पकड शिवसेनेला जराही कमी होऊ द्यायची नाहिये. म्हणून थेट मातोश्रीतून धडगावच्या हालचाली टिपल्या जातात. चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेत आल्यापासून त्या धोरणाला चांगलीच धार चढली आहे. परिणामी प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेनेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामना रंगतो त्याचबरोबर शिवसेनेची छाप आणि जरब उमटलेली पहायला मिळते. धडगांव नगरपंचायतच्या अवघे दीडशे-दोनशे मतदार असलेल्या छोट्या छोट्या वॉर्डांमधून रंगलेल्या निवडणूकीला हे असेही संदर्भ आहेत. एकूणच काॅग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी व अपक्षंना शिवसेना आव्हान देऊ पहात आहे व यामुळेे तिरंगी सामना लक्षवेधी बनला आहे.