नंदुरबार – काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या स्थानिक प्रमुख नेत्यांनी आघाडी धर्म निभावणार असल्याचे स्पष्ट करीत येथील जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना महाविकास आघाडी एकत्रच राहील, याची ग्वाही ‘एनडीबी न्यूज वर्ल्ड’ शी बोलताना दिली. दरम्यान, ऍड. सीमा वळवी यांचे अध्यक्षपद सुरक्षित राहणार असल्याचे संकेत मिळत असतांनाच शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील सभापती पदावर दावा सांगायला सरसावली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गटातील आणि पंचायत समितीच्या 14 गणातील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणूक पार पडली व काल त्याचे निकाल जाहीर झाले. निकाला अंती काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे संख्याबळ वाढले तर, भारतीय जनता पार्टीचे संख्याबळ पंचायत समिती व जिल्हा परिषद दोन्ही स्तरावर कमी झाले. आता जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 24, शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे 3 तर भाजपाचे 20 असे पक्षीय बलाबल बनले आहे. काँग्रेस आणि शिवसेना मिळून स्थापन केलेली सत्ता तशीच कार्यरत राहिल व राष्ट्रवादी देखील सत्तेत सहभागी होईल असे सध्या दिसत आहे. या तीनही पक्षांची सदस्यसंख्या 35 होत असल्याने आघाडीची सत्ता मजबूत बहुमतात राहू शकणार आहे.
तथापि निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली होती. शिवसेनेचे जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी करण्याचा मांडलेला प्रस्ताव दुर्लक्षित केला होता. आघाडीचे घटक पक्ष असूनही ह्या तीनही पक्ष नेत्यांनी काही ठिकाणी एकमेकांविरोधात प्रचार करीत जागा लढवल्या होत्या. परिणामी सत्तास्थापने प्रसंगी आघाडी धर्माचा मुद्दा तापणार असा तर्क लावला जात होता. नव्याने सत्ता स्थापन करताना पदांचे वाटप कसे होणार? यावरही प्रश्न केला जात होता.
या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा नेते आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एडवोकेट के सी पाडवी ‘एनडीबी न्यूज वर्ल्ड’ला सविस्तर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निवडणुकीच्या आधी महा विकास आघाडी कायम ठेवून लढण्या विषयी आमच्या एकत्रित चर्चा झाल्या होत्या परंतु नंतर काही कारणाने प्रत्येक पक्षाला आपापली स्वतंत्र भूमिका घ्यावी लागली. असे असले तरी आता जे निकाल समोर आले आहेत. ते पाहता काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 35 जागा झाल्या आहेत आणि आम्ही मजबूत आघाडी देऊ शकत आहोत. हे लक्षात घेऊनच पुढचे सर्व निर्णय घेतले जातील. शिवसेनेला आधी प्रमाणेच उपसभापती उपाध्यक्षपद आणि दोन सभापती पद सोडले जातील व आघाडी धर्म निभावूनच पदे दिली जातील. विद्यमान अध्यक्षांचे नियमानुसार आठ महिने बाकी आहेत. त्यामुळे त्यावर भाष्य करता येत नाही. काय करणे कायदेशीर राहील, हे बघूनच त्यावर भाष्य करता येईल, असे क.सी. पाडवी म्हणाले.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून आघाडी धर्म निभावला जाईल व लवकरच बैठक घेऊन पुढील कार्यक्रम जाहीर केला जाईल असे शिवसेनेचे जिल्हा नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही ‘एनडीबी न्यूज वर्ल्ड’ला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले व पुढे म्हणाले की,नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहिल आणि उपाध्यक्षपद शिवसेनेकडे राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जाहीर झालेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते पुढे म्हणाले की, फक्त नंदुरबार नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्या. इम्पेरियल डाटा विषयी भाजपाने घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, हे सर्व ओबीसी जाणून आहेत आणि त्याचाच फटका भाजपाल बसला; असे सांगून चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले की, आपल्या कन्येला निवडून आणण्यासाठी डॉक्टर गावित यांच्यासह एकाच मतदार संघात भाजपाचे खासदार, आमदार, माजी आमदार, झेडपी सदस्य वारंवार फिरत राहिले. पक्षाच्या अन्य उमेदवारांना मात्र त्यांनी वाऱ्यावर सोडले. मात्र जनता आमच्या सोबत असल्यामुळेच पंचायत समितीच्या चार जागा देखील शिवसेनेला मिळाल्या. त्यामुळेच नंदुरबार पंचायत समितीत आता शिवसेनेचा सभापती बसेल, असे रघुवंशी म्हणाले.
याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी देखील म्हटले आहे की, धनशक्तीला पराजित करीत जनशक्ती विजयी झाली आणि जिल्हापरिषद पंचायतसमिती पोटनिवडणुकीच्या निकालातून मतदारांनी भाजपाला नाकारल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात पुन्हा पाय रोवून उभे राहण्याच्या प्रयत्नात असतांनाच शहादा तालुक्यात जे यश मिळाले आणि जिल्हापरिषदेतील संख्याबळ कायम राहिले ते कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवणारे आहे; असे नमूद करून त्यांनी जिल्हापरिषदेतील सत्ता गणितांबद्दल सांगितले की, महाविकास आघाडी कायम ठेऊन लढावे यासाठी आमच्या तीनही पक्षांच्या बैठका झाल्या आणि म्हणूनच समझोत्याने काही जागा लढवता आल्या. आता सभापती पदाचे वाटप ठरेल तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक सभापतीपद मिळावे, यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून मी आग्रही राहणारच तथापि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वत:च यावर विचार करावा; अशी अपेक्षा देखील डॉ.अभिजित मोरे यांनी व्यक्त केली.