नंदुरबार- आज आणि उद्या पुरेसा पाऊस होऊन विरचक धरणाची पातळी वाढावी आणि नवापुर तालुक्यातील खोलघर धरण ओव्हर फ्लो होऊन आधार मिळावा; याची नंदुरबार नगरपालिका प्रशासन चातकासारखी वाट पाहत आहे. असे नाही झाले तर शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची अधिकृत घोषणा नगरपालिकेकडून केली जाऊ शकते.
पावसाचे अखेरचे थोडेच दिवस शिल्लक आहेत. या पाच सहा दिवसात काही भर पडली नाही तर उन्हाळ्यात गुरा-ढोरांच्या चारा-पाण्यासह माणसांनाही पाण्याची वानवा भासू शकते. आकडेवारीवरुन तसे दिसत आहे. त्याच बरोबर नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणार्या विरचक धरणाने पुरेशी पातळी गाठलेली नाही. विरचक धरणात अवघे 45.50 टक्के पाणीसाठा आहे. अशात शहरवासियांनी बेफिकीर राहून पाण्याची नासाडी चालू ठेवल्यास नंदुरबार नगरपालिकेवर पाणीकपातीचा प्रसंग येऊ शकतो; याचे संकेत याआधी देण्यात आले होते. विरचेक येथील शिवण मध्यम प्रकल्पातून नंदुरबार शहराला व मुख्यालयाला पाणी पुरवठा केला जातो. यंदा या प्रकल्पात पाण्याची आवक झाली नसल्यामुळे फक्त ८.२३ द.ल.घ.मी पाणी साठा उपलब्ध आहे. सध्या नवापूर तालुक्यात पाऊस चालू आहे. नवापूर तालुक्यात पुरेसा पाऊस होऊन खोलघर धरण ओवरफ्लो झाल्यास त्याचा लाभ विरचकची पातळी वाढणसाठी होतो. म्हणून आज तसे काही घडते का? याकडे नंदुरबार नगरपालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. नदी क्षेत्रात आज रात्रीतून पाऊस पडून पूर येण्याचा चमत्कार घडल्यास त्यामुळे देखील विरचक धरणाची पातळी वाढू शकते आणि नंदुरबार शहरावर आलेले पाणीकपातीचे संकट टळू शकते.
परंतु असे न झाल्यास पाणीकपातीची अधिकृत घोषणा करण्याची तयारी नगरपालिकेच्या प्रशासनाने तसेच सत्ताधारी सूत्रांनी करून ठेवली आहे. ऐन विजयादशमीच्या सुमारास किंवा दुसऱ्या दिवशी या विषयीची अधिकृत बातमी धडकू शकते. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एनडीबी न्यूज शी बोलताना काही दिवसापूर्वीच जनतेला पाणी वाचविण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीकपातीचा कठोर निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर एनडीबी न्यूज वर्ल्ड शी बोलताना पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनी सांगितले की, विरचक धरणात अवघे 45 टक्के पाणी साठा शिल्लक असून पातळी न वाढल्यास रोज शहरवासीयांना द्यावे लागणारे दोन कोटी लिटर पाणी देणे शक्य होणार नाही. उन्हाळ्यात समस्या उद्भवू नये म्हणून व दक्षतेचा भाग म्हणून पाणी कपातीच्या पर्यायाकडे बघत आहोत. आज उद्या पाऊस किती बरसतो ते पाहू, त्यानंतरच अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल; असे कैलास पाटील म्हणाले. यामुळे नंदुरबार वासियांच्या चिंतेत वाढ होणार, हे यावरुन स्पष्ट दिसत आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, हाच यावर महत्वाचा पर्याय आहे.