नंदुरबार – उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सिम्युलेटर मशीन कार्यान्वीत करण्यात आले आहे. येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे ड्रायव्हींग लायसन्स चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना शास्त्रशुध्द पद्धतीने वाहन कसे चालवावे याचा अनुभव या सिम्युलेटर मशीनद्वारे घेता येईल.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे ड्रायव्हींग लायसन्स चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना शास्त्रशुध्द पद्धतीने वाहन कसे चालवावे याचा अनुभव येण्यासाठी सिम्युलेटर मशीन बसविण्यात आले आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सिम्युलेटर मशीन शासनाद्वारे देण्यात आले असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे एक मशीन प्राप्त झाले आहे. व्हटॅक्स रिसर्च फाउंडेशन, तामिळनाडु या संस्थेने या मशीनची निर्मिती केली असून या मशीनची किंमत सुमारे ५.५ लक्ष रु. आहे. प्रत्यक्ष बहन चालविण्याचा अनुभव येण्यासाठी या मशीनमध्ये स्टिअरींग व्हील, एल.सी.डी. स्क्रीन, गीअर बॉक्स, क्लच, ब्रेक, ॲक्सीलेटर, हॉर्न, वायपर, इंडिकेटर, इत्यादी सर्व यंत्रणा देण्यात आल्या आहेत. वाहनचालकाने सिम्युलेटर मशीनवर वाहन चालवितांना केलेल्या चुकांची नोंद संगणकाद्वारे घेतली जाते व मशीनवर सहा किलोमीटरचे ड्रायव्हींग पूर्ण झाले की त्या चुकांची यादी पहाण्यासाठी उपलब्ध होते.
वाहनचालकाला प्रत्यक्ष रस्त्यावर वाहन चालविण्याचा अनुभव यावा यासाठी वेगमयदिचे फलक, सिग्नल यंत्रणा, नाईट ड्रायव्हींग, इत्यादी बाबींचा अंतर्भाव या मशीनमध्ये करण्यात आला आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे दररोज सुमारे ६०-७० अर्जदार लायसन्स काढण्यासाठी येत असतात. यातील सुमारे ९-१० अर्जदार चाचणीमध्ये अनुत्तीर्ण होतात अनुत्तीर्ण झालेल्या अर्जदारांना प्रशिक्षण देण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येत आहे.