नंदुरबार – कोविड-19 विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाच्या अटी व शर्तींचे नागरिकांनी पालन करावे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
नव्या नियमानुसार कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती, सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (खेळाडू, अभिनेते इत्यादी) कार्यक्रमस्थळी येणारे व्यक्ती, पाहुणे, ग्राहक याचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, मेळावे इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे. त्याबरोबर अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.
सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. यासाठी राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास किंवा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले ‘कोविन प्रमाणपत्र देखील’ त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. ज्याठिकाणी सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी त्या खुल्या असण्याची अट नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक राहील.