आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्याच्या पत्नीचे तीव्र आंदोलन; चालकाला बांगड्या दाखवत रोखली बस
धुळे – आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीसह काही कर्मचाऱ्यांनी बस चालकाला बांगड्या दाखवत साक्री आगारातून निजामपुरकडे जाणारी एसटी बस रोखून धरली व तीव्र स्वरूपात आंदोलन केले. यामुळेे त्या आगाराच्या आवारात एकच धावपळ उडाली व 13 कर्मचाऱ्यांसह महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप चालवला आहे. एसटी प्रशासनाने हा संप मोडीत काढण्यासाठी पावले उचलली. मात्र कर्मचारी संघटना मागण्यांवर ठाम आहे व आगारातून बस सोडायला विरोध चालू ठेवला आहे. दरम्यान, आज 9 डिसेंबर 2021 रोजी साक्री बसस्थानकातून निजामपुर कडे जाण्यासाठी एम एच 20 बीएल 436 क्रमांकाची बस चालक शशिकांत जीरे हे घेऊन निघाले होते. तथापि चालकाने ही बस साक्री बस स्थानकातून बाहेर काढत असतानाच शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून विलिनीकरणाची मागणी मान्य करावी, या मागणीसाठी योगिता कमलाकर बेडसे यांनी काही महिलांसमवेत उभे राहून बस अडवून धरली व आंदोलन केले. ज्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली ते एसटी कर्मचारी यांच्या त्या पत्नी आहेत. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून विलिनीकरणाची मागणी मान्य करावी तसेच या संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या आंदोलनात अर्चना शरद खैरनार, माया संजय मोरे ,मनीषा अनिल गावित, अनिता जितेंद्र ढोमसे ,मनीषा भास्कर कळकोटे, किरण निंबा पाटील ,पुष्पलता भटूराव पवार, सोनाली अनिल जगताप, स्वप्नील शिवदास साळुंके, अतुल राजाराम साळुंके ,जयवंत सुभाष भामरे, सुनील मधुकर भामरे यांनी चालकाला ही बस बाहेर घेऊन जाऊ नये, असे वारंवार आवाहन केले. या प्रकाराची एसटी महामंडळाने गंभीर दखल घेत साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वरील सर्व तेरा जणांविरोधात भादवि कलम 341, 143, 186, 147, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये आंदोलन करणाऱ्या कर्मचारी आणि महिलांनी चालकाला बांगड्या आणि फुलहार दाखवून महामंडळाच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला .