आदर्श व नि:स्वार्थी समाजसेवक सिंधुताई सपकाळ

आदर्श व नि:स्वार्थी समाजसेवक सिंधुताई सपकाळ

निष्काम कर्मयोगी, अनाथांची माय म्हणून स्वतःच्या निस्वार्थी कार्याने समाजात आपली ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 75 व्या वर्षी 4 जानेवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. स्वतःच्या जीवनात घोर संकटांचा सामना करत न खचता अनाथ मुलांना मायेची ऊब देऊन त्यांचे दायित्व घेणाऱ्या सिंधुताई आज थोड्याशा संकटांनी खचून जाणाऱ्यांसाठी मोठा प्रेरणास्त्रोत आहेत. सुसंस्काराच्या भक्कम पायावर उभे राहात त्यांनी आपल्या संस्कृतीतील तत्त्वांना केंद्रीय मानून स्वतःचे जीवन व्यतीत केले. घोर
संकटांची साखळीच आयुष्यात असूनही त्यांनी आपली श्रद्धा ढळू दिली नाही. आज स्वतःच्या छोट्याशा कार्याने समाजात स्वकर्तुत्वाचे गुणगान करणारे संस्कृती विरोधी समाजसेवक जास्त प्रमाणात दिसून येतात. महिला सक्षमीकरणाचे एक आदर्श उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ होय. स्त्री-पुरुष समानतेविषयी त्या म्हणतात स्त्री ही स्त्री आहे तिच्यामुळे कुटुंब आणि देश चालतो, तिची पुरुषांशी बरोबरी कशी होईल, समान अधिकार म्हणजे हक्कांसाठी भांडणे नव्हे. तर त्या म्हणत स्त्रियांनी अबला नव्हे तर खंबीर असावें, स्त्रियांनी संस्कृतीचे भान राखून वागले पाहिजे त्यांना संस्कृती विषयी आदर होता. त्यांच्या साध्या राहणीमानातही संस्कृतीची झलक जाणवते. त्या नऊवारी साडी परिधान करत कुठेही आपल्या संस्कृतीचे आचरण करण्यात त्यांनी भीड बाळगली नाही. त्या अमेरिकेतही आपल्या याच सांस्कृतिक पोशाखात गेल्या होत्या. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपल्या संस्कृतीला हिन लेखनाऱ्यांसाठी त्या एक आदर्श होत. इयत्ता चौथीपर्यंत शिकलेल्या सिंधुताईंचे विचार खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला पूरक आहेत. नुकतेच सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांच्या कार्याचा गौरव केला. ‘फूलावरून जाताना काटेही आडवे येणारच, ही तयारी पावलांनी ठेवायची असते’ असे मानत आपले आयुष्य जगणाऱ्या निस्वार्थी सेवा करत संस्कृतीच्या भक्कम पायावर आपल्या कृतीतून समाजाला वैचारिक प्रगल्भता देणाऱ्या या अनाथांच्या माऊलीला विनम्र अभिवादन.

– डॉ०. प्रणिता चिटणीस, संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!