आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

 

वाचकांचे मत:

प्रति,
मा. संपादक,
कृपया प्रसिद्धीसाठी
 आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण येथे 1845 या वर्षी झाला.  कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार अनंतराव फडके हे त्यांचे आजोबा त्यांच्या पासूनच त्यांनी स्वातंत्र्य प्रीतीचा वसा घेतला. वैभवात जन्मलेले व वाढलेले वासुदेव बळवंत फडके हे गोरेपान,सरळ नाक, पाणीदार निळसर डोळ्यांचे, सदृढ शरीर यष्टी लागलेले वीर होते. मुंबईत शिक्षणानंतर ग्रँट मेडिकल महाविद्यालयात त्यांनी काही काळ नोकरी केली.  नंतर मिल्ट्री फायनान्स ऑफिसात नोकरी धरली. सैनिकी विभागाशी संबंधित नोकरी असल्यामुळे ब्रिटिशांच्या सैनिकी व्यवस्थेची बरीचशी माहिती त्यांना आपोआपच मिळाली होती.  त्यांच्या आई अत्यवस्थ असल्याचे वृत्त आल्यावर आईला भेटण्यासाठी त्यांनी कार्यालयातून सुट्टी मागितली असता त्यांना सुट्टी न मिळता अपशब्द ऐकावे लागले ते तसेच आईला भेटायला निघून गेले परंतु त्यांच्या जाण्याआधीच त्यांच्या आईचे निधन झाले होते.  आईची शेवटची भेट न झाल्यामुळे इंग्रज अधिकाऱ्याचा त्यांना खूप राग आला व ब्रिटिशांविरुद्ध त्यांचे मन प्रक्षुब्ध झाले.  नंतर स्वदेशी चळवळीत सहभागी होऊन ते खेड्यापाड्यात जाऊन स्वदेश, स्वातंत्र्य यावर व्याख्याने देऊ लागले. इंग्रजांमुळे शेतकऱ्यांची, गोरगरिबांची होणारी दैना पाहून ते त्यांना त्याची जाणीव आपल्या व्याख्यानातून करून देऊ लागले.  पुण्यात त्यांनी तलवार, दांडपट्टा व मल्लविद्या शिकविण्याचा वर्ग काढला. त्यात 100 ते 150 तरुण येत असत त्यांच्यासोबत त्यांनी एका गुप्त संघटनेची स्थापना केली.  इंग्रजांचे हे राज्य उलथून स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज देशाचे भले होणार नाही अशी त्यांची खात्री होती ते आत्मवृत्तामध्ये म्हणतात, ‘ज्या भूमीच्या पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करत उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरत रहावे, हे मला पहावले नाही आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात मी बंड पुकारले ! अहो, माझ्या हिंदुस्थानवासी बांधवहो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणास लावत आहे. असा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला ? दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या ? तसेच माझे प्राण घेऊन तरी ईश्‍वराने तुम्हाला सुखी करावे, अशी माझी त्याला प्रार्थना आहे ! मी मरून जाईन; पण या दुष्ट, प्रजाभक्षक, चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही मी शांतता लाभू देणार नाही.’  अशा या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः विनम्र अभिवादन.
डॉ० पी. एस. महाजन
संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!