आधी कोणती निवडणूक? झेडपी की नगरपालिका?

नंदुरबार – आधी कोणत्या निवडणूका होणार? जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या की नगरपालिकांच्या? हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत असून कार्यकर्त्यांमध्ये त्यावर काथ्याकुट चालू असतो. निवडणुका होणार की पुढे ढकलल्या जाणार? यावरही अंदाज मांडणे चालले आहे. त्याविषयीची उत्सुकता ताणलेली असतानाच आता आधी नगरपालिका निवडणूक होणार आणि नंतर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका होणार, असल्याचे संकेत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी अखेरपर्यंत सर्व निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यानुसार २० जानेवारीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आला असून सर्व पक्ष देखील तयारीला लागले आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सर्वात आधी होण्याची शक्यता होती. मात्र, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेतीत मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली मदत प्रत्यक्ष हाती मिळण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका डिसेंबर अखेरीस घ्याव्यात, यावर भर दिला जात असल्याचे समजते.
या संदर्भात आयोगाने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनासोबत तयारीचा आढावा घेतल्याचे वृत्त आहे. आधीच्या नियोजनानुसार २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबरअखेर घेण्याची योजना होती. परंतु आता त्यावर पुनर्विचार केला जात असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वरीष्ठ पातळीवरुन वर्तवली जात आहे. तर डिसेंबर अखेरीस राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. तसेच जानेवारी १५ ते २० दरम्यान २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तथापि अजून पर्यंत यावर कोणतीही अधिकृत माहिती प्रसारित झालेली नाही. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपरिषद/नगरपंचायत/जिल्हा परिषद-पंचायत समिती) निवडणुकांसाठी मतदार यादी 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम किती कालावधीत घोषित होऊ शकतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक स्थगित होणार का?
दुसरीकडे मात्र, राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीमधील शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मोठे आरोप केले होते आणि पुरावेही सादर केले होते. ते आरोप राज्य निवडणूक आयोगाने खोडून काढले आहेत. असे असले  तरीही जोपर्यंत सदोष यादी आहे तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका, अशी मागणी राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे लावून धरली आहे. त्यासाठी न्यायालयात जाण्याची देखील तयारी चालवली आहे. गेल्या पाच वर्षांपासून निवडणुका थांबवल्या आहेत, तर आणखी सहा महिने निवडणुका पुढे गेल्यास काय फरक पडतो, अशी विचारणा करत उद्धव ठाकरे तसेच राज ठाकरे यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा मतदार याद्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाणार का? हा प्रश्न अद्याप कायम आहे.

One thought on “आधी कोणती निवडणूक? झेडपी की नगरपालिका?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!