नंदुरबार – आमदारांची पंचायत राज समिती बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर पासून नंदुरबार जिल्हा दौर्यावर येत असून सलग तीन दिवस जिल्ह्यातील कामकाजाची पाहणी करणार आहेत. 31 सदस्यांचा समावेश या समितीत राहणार आहे. दरम्यान नंदुरबार शहरात काही ठिकाणी आमदारांच्या स्वागताचे फलक झळकू लागले आहेत.
यासंदर्भात मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या कामाचा अहवाल जाणून घेण्यासाठी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजन करावे असे आवाहनही गावडे यांनी केले. िनांक 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान पंचायत समिती जिल्हा दौऱ्यावर असून सदस्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होईल. या समितीत बुलढाण्याचे आमदार संजय रायमुलकर यांच्यासह तीस सदस्यांचा समावेश आहे. पंचायत राज समिती 20 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेला विविध विभागांच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य यांच्याशी चर्चा करतील तसेच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. दुपारी 11:30 वाजता लेखा पुनर्विलोकन अहवालातील सदस्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष होईल. दिनांक 21व 22 ऑक्टोंबर रोजी या समितीचे अध्यक्ष आणि सदस्य बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. तीन दिवस दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समिती समोर अहवाल सादर करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांची एकच धावपळ होताना दिसून येत आहे. मंगळवारी ईद ए मिलाद निमित्त सुट्टी असतानादेखील जिल्हा परिषद परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकीची लगबग दिसून आली.