नंदुरबार : तालुक्यातील समशेरपुर येथील आयान मल्टीट्रेड साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला प्रारंभ करण्यात आला असून त्याच बरोबर सहवीज निर्मिती प्रकल्प देखील सुरू करण्यात आला. मागील महिन्यात आयकर विभागाने छापा मारून केलेल्या तपासणीमुळे हा कारखाना चर्चेत आला होता.
त्या तपासणीत काय आढळले हे अद्याप जाहीर झालेले नाही. तथापि कारखाना व्यवस्थापनाने गाळप विस्तार करून अधिक जोमाने काम सुरू केले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या हस्ते संगणकीकृत अत्याधुनिक स्वयंचलित ऊस वजन काट्याची आणि गव्हाणीचे पूजन करण्यात आले व गव्हाणीत मोळी टाकून गाळपास प्रारंभ झाला. या शुभारंभ सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.सी बडगुजर होते. कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे, अतुल क्षीरसागर, ऊस उत्पादक, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बडगुजर यांनी यावर्षी सुमारे बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती दिली. तसेच अधिकचा एफआरपी दिल्यामुळे साखर आयुक्तांनी जी नामांकन यादी घोषित केली त्यात आयान कारखान्याला ग्रीन झोन मधील सर्वोच्च नामांकन जाहीर झाले ही बाब समाधानाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कारखान्याची गाळप क्षमता वाढली आहे. परिसरातील संपूर्ण उसाचे गाळप होईल. अन्य कारखान्यापेक्षा आणि एफआरपीपेक्षा शंभर रुपये प्रति मेट्रिक टन जास्त दर दिला आहे. यावर्षी देखील कारखान्याकडून अधिकचा दर दिला जाईल. ऊस उत्पादकांनी आपला ऊस कारखान्याला द्यावा; असे आवाहन यावेळी करण्यात आले. डिझेलच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे वाहतूक दर वाढवण्यात येईल, कारखान्याच्या कामगारांना दिवाळी बोनस पोटी ८.३३ टक्के रक्कम दोन दिवसात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे घोषित करून वाहतूकदार व कर्मचारी यांना बडगुजर यांनी दिलासा दिला.
सहवीजनिर्मिती प्रकल्प
मुख्य कार्यकारी अधिकारी बडगुजर यांनी ‘एनडीबी न्यूज वर्ल्ड’ ला अधिक माहिती देताना सांगितले की, कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प याच प्रसंगी सुरू करण्यात आला. बगॅस पासून वीज निर्मिती करणारा हा प्रकल्प हंगाम चालू असेपर्यंत म्हणजे बगॅस उपलब्ध असेपर्यंत चालतो. मागील वर्षी त्याचा प्रारंभ झाला. या प्रकल्पातून 32 मेगावॅट वीज नर्मिती होते. यावर्षी अधिक प्रमाणात गाळप होणार असल्यामुळे मागील वर्षापेक्षा अधिक वीज निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचे बडगुजर म्हणाले.