नदुरबार- तालुक्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती घेणे सुरू केले आहे. दीडशे कोटी रुपयांच्या मालमत्ते प्रमाणेच साखर कारखान्याच्या माध्यमातून चाललेले आर्थिक व्यवहार तपासणीसाठी विशेष केंद्रीय पथक आले असल्याचे म्हटले जात आहे. परंतु कारखान्याच्या आवारात कोणालाही प्रवेश दिला जात असल्यामुळे प्रत्यक्षात कोण कोण आलेले आहेत आणि काय तपासणी चालू आहे याची खात्री कोणालाही करता आलेली नाही. सेंट्रल फोर्स च्या मदतीने हे पथक तपासणी करीत आहे. आयान मल्टीट्रेड साखर कारखाना म्हणजे पूर्वाश्रमीचा पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना आहे. 1996 मध्ये मोहनभाई चौधरी यांनी पुष्प दंतेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. कालांतराने म्हणजे अवघ्या पंधरा वर्षातच तो अवसायानात काढण्याची वेळ आली. अवसायनात काढून नंतर त्याची विक्री करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित ऑस्टेरिया शुगर कंपनीने हा कारखाना खरेदी केला होता. दीडशे कोटी रुपयांची मालमत्ता असताना अवघ्या 47 कोटी रुपयात विक्री झाल्याचे त्यावेळी ओरड झाली होती. या कंपनीने बँकेतून मोठे कर्ज घेतले होते. दरम्यान, कारखान्याचे नामकरण पुन्हा करण्यात आले व आयन मल्टीट्रेड कंपनीच्या हेड खाली साखर कारखाना आणि त्याचे व्यवहार चालू ठेवण्यात आले. या कंपनीचे मालक शिंगारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. आयकर विभागाची वक्र नजर नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच अशा मोठ्या स्तरावर पडली असून काही राजकीय घटकांधे यामुळे अस्वस्थता वाढली आहे.