नंदुरबार – जी अमेरीका मोदींना व्हीजा देत नव्हती ती जागतिक महासत्ता मोदीजी यांच्यासाठी आज रेड कार्पेट टाकत आहे, हा भारताचा विश्वसन्मान असून मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर यशस्वी झाले आहे. परंतु देशाचा हा विकास होवू नये यासाठी काही लोक लोकशाहीच्या नावावर देशविरोधी कृत्य करत असून देशाच्या विविध भागात दंगली आणि नक्षली कारवाया घडवून आणत आहेत; असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री कैलास विजय वर्गीय यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री कैलास विजय वर्गीय हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलत होते. त्या प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षाच्या कालावधीत मोदी सरकारने केलेल्या कार्याचा तसेच राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लेखाजोखा त्यांनी याप्रसंगी मांडला.
गोरगरीब आदिवासी दलित आणि सर्व धर्मीय जनतेला कल्याणकारी योजना देतानाच मध्यमवर्गीय सवर्ण लोकांना सुद्धा लाभ देण्यात आले. त्या माध्यमातून मोदी सरकारने सबका साथ सबका विश्वास हे घोषवाक्य कृतीत आणले आहे असा दावा याप्रसंगी राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय यांनी केला. जगातील इतर देश अन्नांन्न दशा भोगत आहेत त्या तुलनेने भारतात महागाई नियंत्रित ठेवून संपूर्ण देशाला जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात पुरवल्या जात आहेत आणि हे मोदी सरकारचे मोठे यश आहे, असेही विजयवर्गीय म्हणाले.
यावेळी खासदार विनय तेंडुलकर, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी, राज्याचे आदिवासी विकास मंत्री नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री जयकुमार रावल, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित, भाजपचे धुळे विधानसभा प्रमुख तुषार रंधे हे या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
प्रत्येक जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांचा प्रभाव पक्षात वाढत असल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना भाजपचे राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि कार्यपद्धती सर्वांना सामावून घेणारी आहे त्यामुळेच भाजपामध्ये येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून विचारधारा आवडते म्हणूनच ते भाजपात येतात.
दरम्यान मोदी सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा सांगताना विजयवर्गीय पुढे म्हणाले की, राज्यासह देशाच्या विविध भागात होत असलेल्या दंगली आणि नक्षली कारवायांमध्ये थेट विदेशी शक्तीचा हात आहे. त्या कारवाया घडविण्यात भारत विरोधी लोक असून देशाचा विकास होवू नये हा यामागचा हेतू आहे. छत्तीसगड मध्ये पकडलेल्या नक्षलवादींकडे चायना मेड हत्यारे मिळाली असल्याचे सांगत त्यांनी नक्षलवादींचे उदाहरण दिले. काही लोक लोकशाहीच्या नावावर देशविरोधी कृत्य करत असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेस शासीत राज्यात लव जिहाद सारख्या घटना जास्त असून, भाजपा शासीत राज्यात अशा लोकांवर कारवाया केल्या जातात. या घटना नियंत्रीत असल्याचे कैलाश विजयवर्गीय म्हणाले.