नंदुरबार – राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी.
तसेच, राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोलवरील प्रती लीटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की , ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याची मागणी आहे.
आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती. आता मोदी सरकारने पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आपल्या आघाडी सरकारनेही कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे.
राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात.
आमची मागणी आहे की, आपल्या सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी. तसेच, राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोलवरील प्रती लीटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी.