नंदुरबार- जिल्ह्यात मिरवणुका काढून वाजंत्री चा दणदणाट करीत सर्वत्र गणपती बाप्पांची जल्लोषात स्थापना करण्यात आली. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने गणेश मूर्तीवरील उंचीचे निर्बंध हटविल्याने उंच उंच मुर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी मिळाली आणि त्यामुळे कोरोना कालावधीनंतर प्रथमच गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार येथील मूर्तिउद्योगाला आर्थिक उलाढालीत चक्क कोटी रुपयांची उड्डाणे घेता आली.
गेल्या दोन वर्षांत केवळ चार फूट उंचीची मर्यादा कायम होती. त्यामुळे मोठ्या मंडळांकडून 4 फुटाच्या आतील उंचीच्या मूर्ती खरेदी केल्या जात होत्या. नंदुरबारच्या मूर्ती उद्योगावर मोठा परिणाम झाला होता. यंदा मात्र कोरोनाच्या दोन वर्षांनंतर प्रथमच गणेशमूर्तीच्या उंचीविषयीचे निर्बंध राज्य शासनाने हटविले. परिणामी यंदा मोठ्या प्रमाणात १५ ते १८ फूट उंचीच्या मूर्ती विक्रीला असल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक सार्वजनिक मंडळांने यंदा उंच उंच गणपती मूर्ती स्थापन करण्यावर भर दिला. त्यामुळे येथील मूर्ती कारखान्यांमध्ये बऱ्यापैकी आर्थिक उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले.
नंदुरबारच्या बाजारपेठेत शेकडो विक्रेत्यांच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने काळ्या मातीच्या, शाडू मातीच्या तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकल्या जाऊन मोठी आर्थिक उलाढाल घडली यामुळे मूर्तिकारांपासून छोट्या विक्रेत्यापर्यंत सर्व घटक शिंदे फडणवीस सरकारला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धन्यवाद देताना दिसले.
यंदा एकाहून एक सरस व आकर्षक मोठ्या गणेश मूर्ती उपलब्ध झाल्या. मोठ्या आकारातील चार फुटापासून 18 फुटापर्यंतच्या मूर्तीचा यात समावेश होता. अंदाजे 4000 पासून पन्नास हजार रुपयांपर्यंत त्यांची किंमत होती काही मूर्ती 50 हजार रुपयांहून अधिक किमतीला विकल्या गेल्या. नंदुरबार येथे शंभराहून अधिक मूर्ती बनविणारे कारखाने आणि मूर्तिकार आहेत. गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांमधूनही नंदुरबारच्या लहान मोठ्या मूर्तींना मागणी असते. त्या राज्यातून यंदाही मोठे मागणी दिसून आली. सर्व मूर्तिकारांमध्ये मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा मोठा उत्साह दिसला. त्यांनी 4 इंचापासून 18 फुटापर्यंत निर्माण केलेल्या मूर्ती बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या त्याचबरोबर पेण सारख्या प्रसिद्ध ठिकाणाहून येथे विक्रीला आणलेल्या मूर्ती ंची देखील मोठी उलाढाल झालेली पाहायला मिळाली.
अनेक मोठ्या मूर्ती तयार होण्या आधीच नोंदणी (बुक) केल्या गेल्या होत्या.
आज गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना करण्यापर्यंत झालेल्या उलाढाली संदर्भात काही मूर्तिकारांनी सांगितले की मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कोटी रुपयांची उलाढाल झाली असून सर्वमूर्तीकारांमध्ये समाधान आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतरच आमच्यावरील संकट टळले कारण या सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीला मान्यता दिली त्याचबरोबर उंची विषयीचे निर्बंध हटविले. परंतु हे निर्णय अगदी अलीकडे झालेत. पाच-सहा महिने आधी झाले असते तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आणखी मूर्ती निर्माण करता आल्या असत्या. वेळेवर प्लास्टर ऑफ पॅरिस आम्हाला उपलब्ध होऊ शकले नाही अन्यथा व्यवसायात आणखी भर पडली असती असेही नंदुरबार येथील काही मूर्तिकारांनी सांगितले.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने मंडळांना सोयीचे व्हावे यासाठी सर्व परवानगीसाठी एक खिडकी सुरू केली असून हेल्पलाईनही सुरू झाली आहे.