जळगाव – राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करणे बंधनकारक असतांनाही बोदवड येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात शासनाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली नाही. हे निदर्शनास आल्याने बोदवड तहसीलदार योगेश टोपे यांनी चौकशी सुरु केली आहे.
छत्रपती शिवरायांना लहान मुलांपासून वृद्धांसह ऊभा महाराष्ट्र अभिवादन करत असताना या कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जयंती साजरी न करण्याचा ऊद्दामपणा केलाच कसा ? असा प्रश्न करीत सर्व शिवप्रेमींकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
प्राप्त माहितीनुसार राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करणे बंधनकारक आहे. सर्व शासकीय कार्यालयामधून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आली. मात्र सकाळपासन हे कार्यालय बंद असल्याने या सहाय्यक निबंधक कार्यालयास विसर पडल्याचं दिसून आलं. कार्यालयातील सर्व कर्मचारी कामानिमित्तत बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. तथापि तहसीलदार यांनी पथक पाठवून कार्यालयातील स्थितीचा लागोलाग पंचांसमक्ष पंचनामा करवून घेतला.