एकही रोहित्र नादुरुस्त रहायला नको; अखंड वीज पुरवठा करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांचे निर्देश

जळगाव : रब्बी हंगामात शेतक-यांना उत्तम प्रकारे सेवा देण्यासाठी आणि रोहित्रे नादुरुस्त होऊ नयेत यासाठी ऊर्जा विभागाच्या तिन्ही कंपन्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून वीजपुरवठा अखंडित राहील याची काळजी घ्यावी. रोहित्र बंद पडून वीजपुरवठा ठप्प होणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी बुधवारी दिले.
    रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महावितरण, महापारेषण व महानिर्मिती यांच्या तयारीचा आढावा ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी मंत्रालयात आयोजित एका बैठकीत घेतला. या बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
    सध्या सर्वदूर अतिवृष्टी चालू आहे. अशाप्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाला थांबणे आवश्यक आहे. याबाबत सर्वांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत. वीज विकत घेण्यासाठी महावितरणला वीज पुरवठादाराना रोजच पैसे द्यावे लागते. तसेच देखभाल व दुरुस्तीवर खर्च होत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या चालू बिलासोबत थकबाकी भरावी. शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यासाठी नवीन कृषिपंप धोरण तयार करण्यात आले असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ राऊत यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
सर्व क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क राहून पुरेशी काळजी घेण्यास सांगावे. महावितरणच्या मुंबई मुख्यालयाने तेलाचा व वितरण रोहित्रांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा, जेणेकरून मागणीनुसार त्याचा पुरवठा केला जाईल. यंत्रणेची पूर्वहंगामी दुरुस्ती वेळेवर करावी. यंत्रसामुग्री व देखभालीसाठी लागणारे साहित्य क्षेत्रीय कार्यालयांना वेळेवर उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना डॉ. राऊत यांनी केल्या.
    नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करावे व तेलाचा पुरवठा त्वरीत करता येईल यासाठी तेलाचा पुरेसा साठा ठेवावा,  असे निर्देशही त्यांनी दिले. रोहित्रे, यंत्रणा वारंवार नादुरुस्त होण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करून मुळासकट याचे निवारण करण्यासाठी तातडीने उपाय हाती घ्यावे. यासोबतच वीजचोरीला कसा आळा घालता येईल याचे तसेच महावितरणची हानी कशी टाळता येईल याचेही वरिष्ठांनी नियोजन करून क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
    खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आदी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चांगला जनसंपर्क ठेवून परिस्थिती आपण कशी हाताळणार याची कल्पना देण्याची सूचनाही त्यांनी केली. ज्या ठिकाणी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल अशा ठिकाणी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, संबंधित पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!