एका चोरीची अजब गोष्ट : चोरी करूनही चोरांनी आणि मदत मिळूनही वृद्धाने रक्कम खर्चलीच नाही

नंदुरबार : प्रकाशा येथील निराधार वृद्धाला मिळालेली सानुग्रह अनुदानाची रक्कम चोरीस गेली म्हणून तातडीने पोलिसांनी त्या वृद्धाला मदत म्हणून 50 हजार रुपयांची रक्कम दिली होती. परंतु गरज असून सुद्धा प्रामाणिक वृद्धाने ती रक्कम खर्च केली नाही. तपासाअंती जेव्हा चोरीची आपली रक्कम परत मिळेल तेव्हाच ती आपली रक्कम वापरायची, असा निर्धार त्या वृद्धाने केला होता. दरम्यान जेव्हा चोरांना पोलिसांनी पकडले तेव्हा त्या चोरांनी देखील चोरलेली रक्कम खर्च केलेलीच नाही असे आढळून आले. धक्कादायक असे की या वृद्धाच्या मुलाला पॅरॅलिसिस चा अटॅक आल्यामुळे दोन दिवसापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तरीही त्याने पोलिसांनी दिलेली रक्कम वापरली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली तेव्हा ही एका चोरीची अजब कहाणी सर्वांसमोर आली.

डोक्यावर ‘पुष्पा’ नाव कोरलेला तरुण संशयास्पद फिरत होता; एवढाच धागा हाती लागल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून खेडेपाडे पालथे घालत या निराधार वृद्धाची रक्कम पळवणार्‍यांना अखेर शोधून काढले आहे आणि चोरीस गेलेली 50 हजार रुपयाची रक्कमही परत मिळवली आहे. या संपूर्ण तपास प्रकरणात चोराचे ‘पुष्पा’ सिनेमा वरील प्रेम नडले व चोरीचा तपास लवकर लागू शकला हेच स्पष्ट झाले आहे.
अधिक वृत्त असे की, शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पदम हरचंद कोळी या 75 वर्षीय वृद्धाला कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या त्याच्या पत्नीची सानुग्रह अनुदान रक्कम 50 हजार रुपये मिळाली होती. चोरांनी लगेच लांबवली होती. यामुळे प्रकाशा बस स्थानकावर ते ढसा ढसा रडले. त्याचे फोटो बातम्या प्रसारित झाल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी तात्काळ दखल घेतली. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिनांक 04/02/2022 रोजी पदम हरचंद कोळी यांना पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे गाडी पाठवून बोलावून घेतले व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी स्वखुशीने वर्गणी करून जमा केलेले 50 हजार रुपये रोख दिले होते व त्यावेळी पदम कोळी यांना शब्द दिला होता की ‘तुमची रक्कम चोरणान्या चोराला आम्ही लवकरच बेड्या ठोकू व तुमचे चोरी झालेले पैसे देखील हस्तगत करू असे सांगितले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहादा तळोदा प्रकाशा भागात चोरांचा शोध घेत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत याची अधिक माहिती देताना सांगितले की, डोक्यावर पुष्पा शब्द कोरलेला तरुण संशयास्पद फिरताना आढळला होता व त्यानेच पैशांची थैली लांबवली असावी अशी माहिती या तपासादरम्यान मिळाली. पथकाने लगेचच अनेक सलून वाल्यांना भेटून अशी हेअर स्टाईल करणाऱ्या तरुणांची माहिती मिळवली. खेडोपाडी फिरून तपास केला. तेव्हा तळोदा तालुक्यातील छोटा धनपूर येथील विनोद उर्फ मिठू विरसिंग पवार हा 22 वर्षीय तरुण शेतात लपून बसलेला आढळला. त्याला पकडताच त्याने साथीदार राजू मोवाशे याची माहिती दिली. दोघांनी चोरी केलेली रक्कम परत केली. विशेष असे की आपण पकडले जाऊ या भीतीने या चोरांनी इतक्या दिवसात रुपयाही खर्च केला नव्हता.

दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून प्रकाशा येथील चोरीबाबत विचारपूस केली असता, प्रकाशा येथील चोरीची दखल स्वतः पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी घेतलेली असल्यामूळे आपल्याला पोलीस पकडतील असे समजले होते. म्हणून आम्ही प्रकाशा येथील चोरी केलेले 50 हजार रुपये खर्च न करता ते घरात लपवून ठेवलेले आहे बाबत सांगितले, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपीतांना सोबत घेवून विनोद ऊर्फ मिठु पवार याचे घरातून 32 हजार 500 रुपये व राजू मोवाशे याचे कडून 17 हजार 500 रूपये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केले.
     ईकडे या वृद्धानेसुद्धा पोलिसांकडून मिळालेली मदतीची पन्नास हजार रुपयाची रक्कम खर्च न करता तशीच ठेवली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले की, वृद्धाच्या मुलाला पॅरालीसीस चा अटॅक आला असून दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल केले आहे. तरीही त्या बाबांनी आम्ही दिलेला रकमेला हात लावलेला नव्हता. असे असले तरी आम्ही मदत म्हणून दिलेली रक्कम खर्च करायला निराधार वृद्धास सांगितलेच आहे. शिवाय चोरांकडून जप्त केलेली रक्कमसुध्दा तुमचीच असल्याचे त्या वृद्धास सांगितले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस हवालदार/ दीपक गोरे, पोलीस नाईक/ विकास कापुरे पोलीस शिपाई विजय ढिवरे यांचे पथकाने केली असून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रोख 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहिर करून पथकाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!