नंदुरबार – जिल्ह्यात 2 व 3 नोव्हेंबर रोजी लसीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यात या विशेष लसीकरण शिबीरातून काल दि.2 नोव्हेंबर रोजी 31 हजार 698 इतके लसीकरण झाले. दरम्यान, राहिलेल्या नागरिकांनी आज होणाऱ्या लसीकरण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालक मंत्री एडवोकेट के सी पाडवी आणि जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दुकाने, बाजारपेठा, चित्रपटगृहे सुरु करण्यात आली असून आगामी सण उत्सवांच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून स्वत:चा बचाव करणे गरजचे झाले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांने लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. आगामी सण, उत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेता संसर्ग वाढू नये तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी 2 व 3 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात विशेष लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली असून दि.2 रोजी 384 तर दुसऱ्या दिवशी 389 बुथ लसीकरणासाठी कार्यान्वीत करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभागासह इतर विभाग, लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली. लहान गावात 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून गाव, पाडे, तालुका तसेच प्रभाग निहाय या विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधींसह, सरपंच आणि ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले आहे. दिनांंक 1 नोव्हेंबर अखेर जिल्ह्यातील 14 लाख 93 हजार 720 लोकांना कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 7 लाख 25 हजार 414 नागरिकांनी (48.56 टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे तर 3 लाख 44 हजार 511 नागरिकांनी (23.06) दोन्ही डोस घेतले आहेत. एकूण उद्दीष्टाच्या (71.62 टक्के) 10 लाख 69 हजार 925 लाभार्थ्यांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे, अशीही माहिती मंत्री के सी पाडवी यांनी दिली.
लस घेतली नसेल त्यांना लसीकरणासाठी प्रेरीत करावे, तसेच कर्मचारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह, सरंपच, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगून लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. लसीकरण मोहिमेत अधिकाधिक नागरीकांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी केले आहे.
जिल्ह्यात तालुकास्तरावर कोविशिल्ड लसीचा उपलब्ध साठा पुढीलप्रमाणे – नंदुरबार 10,450 डोस, नवापूर 13,640 डोस, शहादा 16,080 डोस, तळोदा 3,930 डोस, धडगाव 12,640 डोस, अक्कलकुवा 14,810 डोस, जिल्हा रुग्णालय 410 डोस, जिल्हा लस भांडार 57,500 तर नाशिक आरव्हीएस कडून 24,000 लसीचे डोस असे एकूण 1,29,460 डोस शिल्लक आहेत तर कोव्हक्सिन लसीचे नंदुरबार 1,680 डोस, नवापूर 2,580 डोस, शहादा 1000 डोस, तळोदा 1130 डोस, धडगाव 425 डोस, अक्कलकुवा 320 डोस, जिल्हा रुग्णालय 225 डोस, जिल्हा लस भांडार 13,280 डोस तर नाशिक आरव्हीएस कडून 5,280 लसीचे डोस असे एकूण 20,640 डोस शिल्लक आहेत.