नंदुरबार – आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभुमीवर समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीसांनी जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट, कोबींग-नाकाबंदी राबविण्यात आले. यादरम्यान, फरार आरोपी, घातक शस्त्र बाळगणारे संशयित यांच्यासह काही गुन्हेगारांना अटक करण्याची तसेच चोरटी दारू स्पिरिट जप्तीची व नाकाबंदी करून 800 वाहनांची तपासणी करण्याची धडक कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 16/07/2023 चे सायंकाळी 6 ते दिनांक 17/07/2023 चे सकाळी 6 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 18 अधिकारी व 122 अमंलदार नेमण्यात आले होते व संपूर्ण ऑल आऊटचे नेतृत्व नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे हे स्वतः नाकाबंदी / कोंबींग ऑपरेशन / ऑपरेशन ऑल आऊट बाबत सहभागी होवून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देत होते. दरम्यान, दिनांक 17/07/2023 रोजी रात्री 12.00 वाजता नंदुरबार शहरातील बागवान गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दो शाह तकिया इत्यादी परिसरात रुट मार्च करण्यात आला.
नाकाबंदी दरम्यान म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील धडगांव रोडवरील चिखली फाटा येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करीत असतांना मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर वाहनामध्ये 7 प्लास्टीकच्या कॅनमध्ये 67 हजार 200 रुपये किमतीचे एकुण 210 लिटर दारू बनविण्यासाठी उपयोगी पडणारे स्पिरीट आढळले. दारू बनविण्यासाठी उपयोगी पडणारे स्पिरीट मिळून आल्याने स्पिरीट व वाहन असा एकुण 3 लाख 17 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक दिलीप लक्ष्मण पावरा रा. चुंडीपाडा ता. शिरपूर जि. धुळे याचेविरुद् म्हसावद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार जिल्हा हद्दीतून हद्दपार केलेला विपुल सुरेश कोळी वय-23 रा. तिलाली ता.जि. नंदुरबार हा तिलाली येथे आढळून आल्याने त्याचेविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान शहादा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील 5 गुन्ह्यात सन 2021 पासून पाहिजे असलेला आरोपी प्रदिप शिवलाल ऊर्फ शिवल्या पावरा वय 21 रा. ब्राम्हणपूरी ता. शहादा याला पकडण्यात आले. प्राण घातक हल्ल्यासाठी वापरले जाणारे फायटर बाळगताना आढळला म्हणून नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरात गणेश उत्तम गोसावी वय-34 रा. गोसावीवाडा, नंदुरबार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरताना आढळले म्हणून रेकॉर्डवरील 7 आरोपीतांविरुध्द् आणि अन्य 5 संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉन बेलेबल वॉरंटपैकी एकुण 26 नॉन बेलेबल वॉरंट व 44 बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली. तसेच 37 हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले. नाकाबंदी दरम्यान 497 लहान व 288 मोठे असे एकुण 785 वाहनांची कसुन तपासणी करण्यात आली.
ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री दत्तात्रय पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमलदार यांनी केली असून पुढील काळात देखील ऑल आऊट (कोंबींग व नाकाबंदी) योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.