नंदुरबार – जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या माध्यमातून चाळीसहून अधिक आरोपी पकडण्या बरोबरच आज 1 लाख 28 हजार रुपयांच्या तलवारींचा शस्त्रसाठा जप्त केल्याचा दावा केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक-2021 व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी दक्षता म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांवर कारवाई करणयाचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथकाच्या मदतीने गुप्त बातमीच्या आधारे धडगाव गावात मुख्य रस्त्यावर छापेमारी केली. एक इसम हा त्याच्या शेती औजार विक्रीच्या दुकानात लोखंडी बनावटीच्या तलवारी बेकायदेशीर कब्जात बाळगून असल्याचे त्यावेळी आढळून आले. संजय कागडा वळवी, वय ३८ वर्षे, ता. धडगाव जि.नंदुरबार असे त्याने नाव सांगितले. त्याच्या मालकीच्या टपरीची झडती घेतली असता तिथे1 लाख 28 हजार रुपये किमंतीच्या 20 लहान-मोठ्या धारदार तलवारी मिळून आल्या. संजय कागडा वळवी याच्या विरुध्द धडगांव पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, पोलीस अमंलदार अभिमन्यू गावीत दिपक न्हावी, रमेश साळुंके यांनी केली आहे.
दरम्यान ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान काल नंदुरबार जिल्ह्यात 23 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येऊन 113 वाहनांची तपासणी करण्यात आली व 27 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच एका अल्पवयीन गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. प्रलंबीत असलेल्या नॉनवेलेबल वॉरंटपैकी 70 नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करुन एकूण 37 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.