नदुरबार – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समितीतीच्या पाच जिल्ह्यातील रिक्त झालेल्या ओबीसी जागांवर केवळ शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच निवडणुका घोषित झाल्या; असा आरोप करीत नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.
नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवावर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते. म्हणून मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही; असे नमूद करून विजय चौधरी यांनी पुढे म्हटले आहे की, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवायचे असेल तर राज्यात मागासवर्ग आयोग गठित करून त्यामाध्यमातून इम्पेरिकल डेटा संकलित करावा व न्यायालयात सादर करावा, हे राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे नेते वारंवार आघाडी सरकारला सांगत होते. परंतु राज्यसरकारने हेतुपुरस्सर पणे या विषयाकडे दुर्लक्ष केले; असाही आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला.