‘ओमायक्रॉन’ रोखायला नंदुरबारची यंत्रणा सज्ज आहे ? .. वाचा खास रिपोर्ट

योगेंद्र जोशी
नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून आतापर्यंत एकूण ३७ हजार ५६० नागरिक बाधित झाले. यातील ३६ हजार ६०४ कोरोनामुक्त तर ९५१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकच रुग्ण उपचार घेत आहे. परिणामी तसे पहाता  जिल्ह्यात जून २०२१ पासून कोरोनामुक्त वातावरण भासत आहे. परंतू नव्याने आलेल्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरीएंटमुळे देश व राज्यासह जिल्ह्यातही चिंता वाढल्या आहेत. वास्तविक डेल्टा पेक्षा ‘ओमायक्रॉन’ अधिक घातक आहे किंवा नाही, हे भारतात अद्याप सिद्ध झालेले नाही. यामुळे शास्त्रीय व शासकीय आधाराविना धोके सांगणे तसे चूक आहे. यामुळे अकारण अफवा निर्माण करू नये, हे अपेक्षित केले जात आहे. अन्यथा आरोग्य क्षेत्रातले नफेखोर गैरफायदा उठवतात. त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा ‘ओमायक्रॉन’शी लढा द्यायला कितपत तयार आहे, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित होऊ लागले आहे.
 या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य्य यंत्रणेच्या पूर्वतयारीचा तसेच जिल्हा रुग्णालयातील, कोविड हॉस्पिटल्समधील व खाजगी रुग्णालयातील सोयी सुविधांचा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे व जिल्हा आरोग्यय अधिकाऱ्यांसमवेत तातडीने आढावा घेणेे सुरू केले आहे. लस घेतलेली असेल तर नवीन व्हेरीएंट निष्प्रभ ठरु शकतो, असे तज्ञांकडून सांगितले जात असल्याने लसीकरणावर भर देत आहेत. तथापि आरोग्यय सेवा खरोखरची सुदृढ करून पूर्वतयारी ठेवणे आवश्यकच आहे. कारण दुसरी लाट उसळली त्याप्रसंगी जिल्हा वासियांनी याबाबत अत्यंत वाईट अनुभव घेतला आहे. खाटा उपलब्ध असणे, वेगाने चाचण्या केल्या जाणे, केलेल्या चाचण्यांचे अहवाल त्वरित उपलब्ध होणे, दाखल होणारी रुग्ण संख्या लक्षात घेता ऑक्सिजन उपलब्ध ठेवणे, अशा अनेक संदर्भाने  पुरेशी पूर्वतयारी नव्हती. पुरेसे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देखील उपलब्ध नव्हते. वेळेवर खाटा उपलब्ध झाल्या नाही तसेच ऑक्सीजन मिळाला नाही म्हणून मृत्यूची संख्या वाढली, हे उघड गुपित आहे. ‘ओमायक्रॉन’ शी लढतांना ती सर्व पुनरावृत्ती टाळता यावी, हेच खरे आव्हान आहे.
सीमावर्ती भागातून चालणारी विविध प्रकारची तस्करी आणि अवैध धंदे छुपा लोकसंपर्क वाहतूक चालूच ठेवतात, आणि सामान्य माणसांना घरात डांबणारी शासकीय यंत्रणा सतत धावणाऱ्या तस्करी टोळ्यांपुढे मात्र हतबल होतात व परिणामी संसर्ग वाढत राहतो; हे दुसऱ्या लाटेच्या प्रसंगी निदर्शनास आले होते. ही आणखी वेगळी डोकेदुखी आहे. ‘ओमायक्रॉन’ शी लढताना असे अडथळे दूर केले जाणे आव्हानात्मक राहणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी याबाबत जातीने लक्ष घालत असल्याचे म्हटले आहे.
अशी आहे पूर्वतयारी
यावेळेसही पूर्वतयारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. वीस मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सीजन प्लांट चालू असून ऑक्सिजनचे एक हजार सिलेंडर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय रुग्णालयात व अन्य ठिकाणी एकूण 165 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. 234 बिगर व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध आहेत. एकूण 903 ऑक्सीजन बेड उपलब्ध आहेत. एकंदरीत 1 हजार 210 बेड आता उपलब्ध आहेत. शासकीय जिल्हा रुग्णालयाकडे व खाजगी रुग्णालयाकडे आवश्यकतेच्या दुप्पट ऑक्सिजन उपलब्ध आहे, असेही डॉक्टर शिंदे यांनी म्हटले आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता ही अधिक जमेची बाब म्हणता येईल.

     लसीकरण वेगात, परंतु….

लसीकरण हाच एकमेव ऊपाय असतांनाही नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागातील नागरिक मात्र गैरसमजामूळे लस टोचून घ्यायला विरोध करीत आहेत. सार्वजनिक आरोग्याशी खेळ करून मोठ्या जीवित हानीला कारणीभूत ठरणाऱ्या अशा घटकांची समजूत काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तसेच प्रभावी व्यक्तींनी पुढे येणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्यात तसे घडताना आढळत नाही.

तथापि शासकीय माहितीनुसार जिल्ह्यात 14 लाख 20 हजार 200 लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दीष्ट आहे. पैकी 9 लाख 13 हजार 834 नागरिकांनी (64.35 टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे. 4 लाख 69 हजार 627 नागरिकांनी (33.07) लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून 13 लाख 83 हजार 461 (97.41) लसीचे डोस देण्यात आले.
 दरम्यान, ‘कोविड-19’ लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे (शहादा), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन 

‘ओमायक्रॉन’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-19 प्रतिबंधक लस हाच एकमेव उपाय असल्यामुळे लसीकरण प्रत्येकाने करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व 18 वर्षांवरील पात्र नागरिकांचे  100 टक्के लसीकरण  करुन घेण्यासाठी सर्व विभागानी नियेाजन करावे; असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी निक्षून सांगितले. लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी यावेळी केले.

 मोहिमेला गती देऊन दररोज 10 ते 15 हजार लोकांचे लसीकरण करावे. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी  आपल्या कुटूंबातील 18 वर्षांवरील सर्व पात्र सदस्यांचे लसीकरण करणे अति महत्वाचे आहे, असेही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शासकीय पथकांना निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!