नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज देशातील कोविड-19ची स्थिती आणि ओमायक्रॉन या नव्या चिंताजनक उत्परिवर्तकाचा (नव्या व्हेरीएंटचा) संभाव्य धोका, या विषयी आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. कोविड 19 प्रतिबंध आणि व्यवस्थापन, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटीलेटर्स, पीएसए प्लांट, आयसीयू/ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णशय्या, मानव संसाधन, आयटी हस्तक्षेप आणि लसीकरणाची सद्यस्थिती या बाबींचा देखील या आढाव्यात समावेश होता.
नव्या उत्परिवर्तकामुळे जगभरात निर्माण होऊ लागलेल्या परिस्थितीची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. ओमायक्रॉन या उत्परिवर्तकाला तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या उपाययोजना आणि तंत्रज्ञान याविषयी देखील पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. देशात आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णांचे तपशील, त्यांच्या प्रवासाचा इतिहास, लसीकरणाची स्थिती आणि बरे होण्याचे प्रमाण याची माहिती देखील देण्यात आली. अधिकाऱ्यांनी केलेल्या या सादरीकरणानंतर पंतप्रधानांनी सर्व पातळ्यावर अतिशय उच्च पातळीची दक्षता राखण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले.
प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी राज्यांना पाठबळ देण्यासाठी आणि पुढाकाराने कृती करण्यासाठी राज्यांसोबत समन्वयाने काम करण्याची त्यांनी सूचना केली. ते म्हणाले, महामारी विरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही आणि आजही कोविड सुरक्षित वर्तनाचे (प्रतीबंधांचे) काटेकोर पालन करण्याची नितांत गरज आहे.
नवीन प्रकारामुळे उद्भवलेल्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी जिल्हा स्तरापासून सुरुवात करून राज्यांमधील आरोग्य यंत्रणा बळकट असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले. ऑक्सिजन पुरवठा उपकरणांची उपलब्धता आणि ती पूर्णपणे कार्यरत आहेत याची राज्यांनी खात्री करून घेणे, अधिकाऱ्यांना राज्यांसोबत नियमितपणे काम करणे आणि आरोग्य पायाभूत सुविधांच्या विविध घटकांच्या तयारीच्या स्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. ज्यामध्ये मानव संसाधनांचे प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती रुग्णवाहिकांची वेळेवर उपलब्धता, संस्थात्मक विलगीकरणासाठी कोविड सुविधा कार्यान्वित करण्याची राज्यांची तयारी, आणि गृह अलगीकरणात असलेल्यांवर प्रभावी देखरेख , टेलि-मेडिसिन आणि टेलि-कन्सल्टेशनसाठी माहिती तंत्रज्ञान साधनांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नव्याने उद्भवणाऱ्या क्लस्टर्स आणि हॉटस्पॉट्सवर सक्रिय, त्वरित आणि प्रभावी देखरेख ठेवणे सुरू ठेवावे, असे त्यांनी नमूद केले. INSACOG प्रयोगशाळांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह नमुने तातडीने पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. वेळेवर प्रतिबंध आणि उपचारांसाठी बाधितांची त्वरित ओळख सुनिश्चित करण्यासाठी चाचण्या वाढवण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी संपर्क शोध कार्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच केंद्र सरकारने कमी लसीकरण, वाढती रुग्णसंख्या , अपुऱ्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधा असलेल्या राज्यांमध्ये परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करण्यासाठी पथके पाठवावीत असे निर्देशही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले.
पंतप्रधानांनी निर्देश दिले की राज्यांनी पात्र लोकसंख्येचे कोविड 19 विरूद्ध पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे याची खात्री करणे आणि लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या बैठकीला कॅबिनेट सचिव डॉ. व्ही.के.पॉल, सदस्य (आरोग्य),नीती आयोग , गृह सचिव ए.के.भल्ला, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, सचिव (फार्मास्युटिकल्स), जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ.राजेश गोखले, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा, नगरविकास सचिव दुर्गा शंकर मिश्रा, एनएचएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. शर्मा , केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.