नवी दिल्ली – ओमिक्रॉन विषाणू आरटीपीसीआर आणि आरएटी चाचण्यांमधून लक्षात येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारे हयगय न करता चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, तसेच राज्यांनी ‘टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट’ धोरणावर पुन्हा भर द्यावा, असा केंद्र सरकारने सर्व राज्यांना सल्ला दिला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोविड-19 च्या नव्या ‘ओमिक्रॉन’ प्रकाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेच्या सज्जतेविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा आज तातडीने आढावा घेतला.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्च स्तरीय बैठक झाली. नवीन ओमायक्रोन विषाणूची बाधा झालेले रूग्ण काही देशात सापडले आहेत. त्यामुळे आपल्या देशामध्ये सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी नीति आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही.के. पॉल उपस्थित होते.
कोविड-19 चा जो नवीन प्रकार उदयाला आला आहे, त्याला ‘महामारी अंतर्गतमहामारी’असे संबोधन देवून डॉ.व्ही. के पॉल म्हणाले, मोठ्या प्रमाणात एकत्रित जमणे, मेळावे घेणे टाळण्याबरोबरच लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
अन्य महत्वाच्या सूचना अशा:
प्रसार माध्यमांना साप्ताहिक संवाद कार्यक्रमातून सर्व परिस्थितीविषयी पुरावे, शास्त्रीय आधार असलेली माहिती नियमित प्रसारित करण्यावर पुन्हा भर देण्यात यावा. आरोग्य विषयक पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढविण्यासाठी तयारी सुनिश्चित करण्यात यावी. (यामध्ये अतिदक्षता विभाग, ऑक्सिजनसुविधेची खाट, व्हँटिलेटर इत्यादींची उपलब्धता) ईसीआरपी-दोन लागू करणे, ग्रामीण भाग आणि बालरूग्णांवर लक्ष केंद्रीत करणे, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर यांचा पुरवठा विनाखंड होईल हे सुनिश्चित करणे तसेच मंजूर झालेल्या पीएसए प्रकल्पांचे काम लवकर सुरू करणे.
जनुकीय क्रमनिर्धारण तपासण्यासाठी सर्व पॉझिटिव्ह नमुने आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत त्वरित पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यांनी पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कांतील व्यक्तींची माहिती जमा करण्याचे आणि 14 दिवस त्याचा पाठपुरावा करण्याचे काम हाती घेण्यास सांगितले आहे.
चाचणीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यात याव्यात आणि चाचणीच्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. आरटी-पीसीआरचा गुणोत्तर लक्षात घेवून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पुरेशा चाचण्या होत असल्याचे सुनिश्चित करावे.