‘कन्यादान’ परंपरा बदलण्याचा संदेश देणारी जाहिरात; ‘मान्यवर’ ब्रँडला दिली चेतावनी

याच जाहिरातीवरून ट्विटरवर नेटकऱ्यांची जुंपली आहे
मुंबई – ‘आता कन्यादान नव्हे, तर कन्यामान’ असा परंपरा बदलण्याचा संदेश देणारी जाहिरात ‘मान्यवर’ ब्रँडने प्रसारीत केल्यावरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हे ‘कन्यामान’च असून ‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची माफी मागून जाहिरात मागे घ्यावी अन्यथा बहिष्कार टाकला जाईल; अशी चेतावनीसुध्दा हिंदु जनजागृती समितीने ‘मान्यवर’ ब्रँडला दिली आहे.
 हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ हा एक महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. तसेच विवाह विधींतील ‘कन्यादान’ हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी असून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. असे असतांना नुकताच ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या कंपनीने ‘मान्यवर’ या प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडची एक जाहिरात प्रसारित केली आहे, त्यामध्ये ‘कन्यादान’ कसे चुकीचे आहे, तसेच ‘दान करायला कन्या वस्तू आहे का’ असे प्रश्‍न उपस्थित करत ‘आता कन्यादान नव्हे, तर कन्यामान’ असा परंपरा बदलण्याचा संदेश दिला आहे. ही जाहिरात हिंदु धर्मातील धार्मिक कृतींचा चुकीचा अर्थ काढून अपप्रचार करणारी, धार्मिक कृतींचा अपमान करणारी आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. हिंदु जनजागृती समिती या जाहिरातीचा निषेध करते. हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हा विधी मुळातच कन्येचा सन्मान करणारा अर्थातच ‘कन्यामान’ आहे. त्यामुळे ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ला या कंपनीने ही जाहिरात त्वरित मागे घेऊन हिंदूंची बिनशर्त क्षमायाचना करावी. जोवर असे होत नाही, तोवर ‘हिंदु समाजाने ‘मान्यवर’ ब्रँडवर बहिष्कार घालावा’ असे आम्ही आवाहन करत आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी कळवले आहे.
या जाहिरातीमधून ‘कन्यादान’ विधी हा एकप्रकारे महिलांचा अपमान असल्याचे दर्शवले आहे. मुळात या विधीद्वारे कन्यादान करताना वराकडून वचन घेतले जाते. कन्या काही वस्तू म्हणून दिली जात नाही, तर वधूपिता वधूचा हात वराच्या हाती सोपवताना सांगतात, ‘विधात्याने मला दिलेले वरदान, जिच्यामुळे माझ्या कुळाची भरभराट झाली, ती तुझ्या हाती सोपवत आहे. ती तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा चारही बाबतीत तिची प्रतारणा करू नकोस आणि तिच्याशी एकनिष्ठ राहा आणि दोघांनी सुखाचा संसार करा.’ त्यावर ‘नातिचरामि’ म्हणत वर म्हणतो, ‘तुम्हाला दिलेल्या वचनाचे मी उल्लंघन करणार नाही.’ इतका श्रेष्ठ असा हा विधी तथाकथित पुरोगामीपणा दाखवत हेतूतः बुद्धीभेद करून हिंदु धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे; असेही रमेश शिंदेे यांनी पत्रकात म्हटले आहे.
   हिंदु धर्मात स्त्री ला देवीचे स्थान दिले आहे. तिचे पूजन केले जाते. पत्नीशिवाय धार्मिक विधींना आरंभच होऊ शकत नाही. तरी हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. सद्यस्थितीत ‘हलाला’, ‘तिहेरी तलाक’, ‘बहुपत्नीत्व’ या प्रथा, तसेच ‘स्त्री ही सैतान आहे’ असे मानणारी विचारसरणी अस्तित्त्वात आहे, याबाबत कोणी जाहिरात तर सोडा, साधा निषेध करायलाही पुढे येत नाहीत. सामाजिक स्वास्थ टिकून रहावे, म्हणून ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ कंपनीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी आणि जाहिरातींसाठीही ‘सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करावे, अशी मागणीही केंद्र सरकारकडे करणार असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!