नंदुरबार – नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला संधी देण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवी गावित यांनी केली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याकडे गावित यांनी तशी मागणी केली आहे.आह लोकसभेची उमेदवारी आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला दिल्यास लोकसभेची निवडणूक आम्ही जिंकून दाखवू , असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे
नंदुरबार लोकसभा मतदार संघात अनेक दशकांपासून काँग्रेस पक्ष उमेदवारी करीत आला आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या मित्र पक्षांना कधीही येथील उमेदवारी करायला मिळालेली नाही. आताच्या निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीने हा मतदार संघ काँग्रेस पक्षाला सोडला आहे.
तथापि इंडिया आघाडीतील तथा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवी गावित यांनी आपल्या पक्षाकडे येथील उमेदवारी साठी गळ घालणारे पत्र दिले आहे. गुजरात विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळी नंदुरबार लगतच्या गुजरात हद्दीतील आदिवासी मतदारांमध्ये आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद चांगला होता तो लक्षात घेऊन तसेच नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींमध्ये आम आदमी पार्टीकडून असलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन ही मागणी केली असल्याचे रवी गावित यांनी कळविले आहे. केंद्रात आणि राज्यात बीजेपी ने काहीच कामे केलेली नाही. केवळ आश्वासनेच देऊन जनतेची दिशाभूल केलेली आहे. मोदी की गॅरंटी हा एक चुनावी जुमला आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
केजरीवाल यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जुने जाणत्या नेत्यांकडे युवकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून नंदुरबार मधील आम जनतेला आता एक नवीन चेहरा आणि नवीन पक्षाची अत्यावश्यकता आहे. शिक्षण, आरोग्य ,रोजगार व स्थलांतराचा प्रश्न, या मुद्द्यावर आम आदमी पार्टी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. भाजपाच्या विरोधात आम आदमी पार्टीचा उमेदवारच यश मिळवू शकतो. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आम जनतेकडून आम आदमी पार्टीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकसभेची उमेदवारी आम आदमीलाच मिळायला हवी तशी मागणी पक्षाचे वरिष्ठ व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.