नंदुरबार – शहरातील वाघेश्वरी चौक म्हणजेच धुळे चौफुली जणू आपल्याला अतिक्रमणासाठीच आंदण मिळालेली आहे; अशा थाटात दिसेल त्या जागी लॉऱ्या, टपऱ्या आणि शेड बांधून कब्जा करण्याची सध्या स्पर्धा चालू आहे. परंतु दबंग मुख्याधिकारी परिमल सिंह यांनी अतिक्रमणाने वेढलेल्या या भागाला केवळ एका दिवसात पूर्ण मोकळे केले. एवढ्यावरच ते थांबले नाही; तर अंतिम उपाय म्हणून अतिक्रमण काढलेल्या जागी चक्क झाडे वाढवण्याचा त्यांनी निर्णय केला आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण देखील तातडीने केले. तथापि, या जागेवर या रोपांचे आयुष्य किती दिवसाचे? हा प्रश्न चौफुलीवरील प्रत्येकाला पडला.
अतिक्रमण काढताना आडवी येणारी राजकीय टगेगिरी मोडून काढण्यासाठी स्वतः जेसीबी चालवून अतिक्रमण उध्वस्त करीत सामान्य जनतेच्या नजरेत हिरो बनलेले नंदुरबार नगर परिषदेचे मुख्य अधिकारी परिमल सिंह यांच्यामुळे नंदुरबार शहरातील अति महत्त्वाचा असलेला धुळे चौफुलीचा परिसर अतिक्रमण मुक्त झाला. या चौफुलीवरील नवापूर बायपासलगतचा कोपरा, शहादा बायपासरोडवर टेकडीलगतचा कोपरा आणि अवल गाजी मशिदलगतच्या रांगेतील सर्व अवैध शेड हटवण्यात आले. या अतिक्रमणामुळे या ठिकाणी वाहतुकीचा होणारा खोळंबा सर्व बडे लोकप्रतिनिधी जाता येता तोंडावर बोट ठेवून वर्षानुवर्ष नुसतेच पाहत आले. परंतु त्यावर कारवाई मात्र होत नव्हती. आज ती कारवाई झाल्यामुळे सर्व शहरवासी परिमल सिंह यांना हिरो मानायला लागले आहे.
दरम्यान येथील अतिक्रमण हटवल्यानंतर काही दिवसात पुन्हा जैसे थे केले जाते. हे परिमल सिंह यांना लक्षात आले असावे. म्हणूनच की काय, त्यावर उपाय म्हणून अतिक्रमण काढलेल्या जागी परिमल सिंह यांच्या आदेशाने आज शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी दुपारी वृक्षारोपण करण्यात आले. नगरपालिकेचे कर्मचारी पाठवून टेकडी लगतच्या कॉर्नरवर मोठी चारी खोदण्यात आली. वेगवेगळ्या जातीच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आणि अग्निशमन बंबाच्या माध्यमातून पाणी देण्यात आले. त्या जागेवर झाडे वाढविल्यास अतिक्रमण होणार नाही; असा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण करण्यात सरावलेल्यांना लक्षात घेता पालिकेच्या या प्रयत्नांना किती प्रमाणात यश लाभते, हे पुढे पाहण्यासारखे राहील.