अ.नगर – येथील ‘कानिफनाथ देव ट्रस्ट मढ़ी’ या नोंदणीकृत न्यासाच्या कथित गैरकारभाराच्या चौकशीची मागणी करीत माजी उपाध्यक्ष सुनिल सानप यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे या देवस्थानाचे विश्वस्त मंडळ आणि कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
उपाध्यक्ष सुनिल सानप यांनी दि. १७ मार्च २०२२ रोजी शेकडो उपोषणकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये धर्मादाय उप आयुक्त कार्यालय अहमदनगर याठिकाणी आत्मदहन करणार असल्याचा ईशारा दिलेला आहे. श्री क्षेत्र मढी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथे चैतन्य कानिफनाथ महाराजांची संजीवन समाधी मंदिर आहे. सदर मंदिराची संपूर्ण देखभाल श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देव ट्रस्ट मढ़ी या नोंदणीकृत न्यासामार्फत केली जाते. सदर देवस्थान हे नवनाथांपैकी एक असून ऐतीहासीक व जागृत असल्यामुळे सर्वांचे शक्तीस्थान आहे. याठिकाणी अनेकांच्या इच्छा पूर्ण होत असल्याने दररोज व मासीक उत्सवाच्या वेळी लाखो भाविक येतात. तसेच यात्रा कालावधीत देशविदेशातील २० ते २५ लाख भाविक नाथांच्या दर्शनाचा लाभ घेतात. संत महात्मे, ऋषीमुनींसारखे नाथभक्त लाखोंच्या संख्येने याठिकाणी उपस्थित राहतात. त्यामुळे हे देवस्थान संपूर्ण भारतभरामध्ये प्रसिध्द आहे.
कथित गैरकारभाराबाबत प्रसिद्धीपत्रकात माहिती देताना सानप यांनी म्हटले आहे की, , न्यासामध्ये स्थानिक ६ तर भाविक भक्तांमधून ५ अशा ११ विश्वस्तांची नियुक्ती दर ५ वर्षासाठी केली जाते. परंतु या न्यास विश्वस्त मंडळात स्थानिक विश्वस्तांचेच संख्याबळ जास्त असल्यामुळे ते हमेशा मनमानी करतात. पत्रकात आरोप करताना पुढे म्हटले आहे की, कार्यरत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष यांनी आपल्या मर्जीतील विश्वस्त मंडळ नियुक्त करून घेतले असून ते पूर्णपणे मनमानी कारभार करीत आहेत. त्यांनी गेल्या सोळा महिन्यात मंदिर बंद असतानादेखील कोटयावधीचा खर्च केला असून येथे नाथभक्तानी अर्पण केलेल्या निधीचा मोठया प्रमाणावर गैरवापर होत आहे; त्यांनी देव ट्रस्टची मालमत्ता हडप करत मंदिर परिसरामध्ये उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत, असे आरोप सानप यांनी पत्रकात केले आहेत. याविषयी धर्मादाय उप आयुक्त कार्यालय अ.नगर येथे अनेक तक्रारी व गैरकारभाराचे पुरावे दिले. असे असतानाही त्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही, असे सांगून पुढे म्हटले आहे की, सदर देवस्थानचा वार्षीक उत्सव सोहळा दि. १७ मार्च २०२२ ते ०२ एप्रिल २०२२ या कालावधीत पार पडणार आहे. मात्र यात्रा सोहळयाच्या नावाखाली मोठी उधळपट्टी चालू असून अणखी मोठया प्रमाणावर गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता आहे. भक्तांनी पोटाला चिमटा देवून दान केलेला निधी सत्कारणी लागावा म्हणून अनेक धार्मीक व सामाजीक संघटनांनी धर्मादाय उप आयुक्त कार्यालय अ.नगर, पुणे, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यायात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. मात्र या कार्यालयांमार्फत वेळकाढूपणा चालू असल्याने भाविकांचा संताप अनावर झालेला आहे, असं नमूद करून पत्रकात यात्रा सुरू होणेपूर्वी तातडीने या मंडळाचे आर्थीक अधिकार काढून घ्यावेत, आर्थीक व्यवहारासाठी शासकीय अधिकारी व देव ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी, दाखल तक्रारी अर्जाची तातडीने चौकशी करण्यात यावी अशीही मागणी केलेली आहे.