नंदुरबार – महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना यापुढे कामाच्या ठिकाणी मध्यान्ह भोजन दिले जाणार आहे. या योजनेचा आज शनिवार दिनांक 7 मे 2023 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते नंदुरबार तालुक्यातील वरुळ, पळाशी, अडची, भवाली व व्याहुर गावांत शुभारंभ संपन्न करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील मयुर अग्रवाल, देवदत्त चव्हाण, कुशल देसले, शेखर माळी सरपंच काळुबाई वळवी, उपसरपंच विरसिंग पवार आदी उपस्थित होते.
मध्यान्ह भोजन योजनेत कामगारांना एका वेळेच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार देण्यात येणार आहे. या आहारात रोटी, दोन भाजी, डाळ, भात व इतर पदार्थांचा समावेश असेल. यावेळी डॉ.गावित म्हणाले की, बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, सामाजिक सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. मध्यान्ह भोजनांची सुरुवात आपल्या गावातून होत असून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात येईल.
*बांधकाम मजुरांना मिळतात हे लाभ*
बांधकाम कामगारांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. अपघाती मृत्यू, नैसर्गिक मृत्यू, तसेच कामगाराच्या मुलांसाठी शिक्षण खर्च, लग्नासाठी 30 हजार आर्थिक मदत, घरे बांधण्यासाठी तसेच हत्यारे अवजारे खरेदी करण्यासाठी 5 हजाराचे अर्थसहाय्य,गृहपयोगी वस्तु संच, सुरक्षा संच देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यासाठी कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहनही पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याप्रसंगी केले. तसेच ज्या लोकांना घर नाही अशा व्यक्तिंना विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल देणार आहे. कामगारांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी शाळेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कामगारांना केले. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,कामगार उपस्थित होते.