तळोदा – बंदीवानांच्या जीवन आचरणात चांगला बदल घडावा या हेतूने कुकुरमुंडा येथील हरेकृष्ण केंद्राचे प्रशासक नितीन भाऊ पाडवी यांनी कारागृहातील बंदीवानांचे व्यक्तिमत्व विकास शिबिर घेतले व त्या माध्यमातून जीवनातील सात्विकता, प्रेमभाव, ईश्वरनिष्ठा किती महत्वाची असते यावर प्रबोधन केले शिवाय सर्व बंदिवानांना श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रती भेट देत अध्यात्माचे महत्त्व विषद केले.
राजपिपला मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी हरे कृष्ण केंद्र कुकुरमुंडाचे प्रशासक नितीन भाऊ पाडवी यांनी हे व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी सर्व कैदी मित्रांना श्रीमद्भगवद्गीतेच्या 100 प्रती मोफत देण्यात आल्या. ज्याची मूळ किंमत शंभर रुपये आहे. प्रमुख वक्ते म्हणून नितीन भाऊ यांनी कैदी मित्रांना कर्म, पुनर्जन्म, आपण कोण आहोत, मानवी जीवनाचे ध्येय आणि चांगले सज्जन कसे व्हावे याविषयी सुंदर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व बंदिवान मित्रांनी नितीनभाऊ पाडवी यांच्याशी वैयक्तिक चर्चा केली आणि चर्चेनंतर सर्व बंदीवान मित्रांनी नितीन भाऊ पाडवी यांचे आभार मानले. आम्हाला एक चांगले जीवन जगण्याचा सल्ला व मार्गदर्शन केले, असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली.
चिंताग्रस्त आणि दुःखी असलेल्या बंदीवान मित्रांच्या जीवनाबद्दल आपण सहानुभूती बाळगली पाहिजे, असे नितीनभाई याप्रसंगी केलेल्या मार्गदर्शनात म्हणाले. श्रीमद्भगवद्गीतेनुसार प्रत्येक माणूस आचरण करीत राहिला तर सर्वांचेच जीवन सुंदर आणि सुसह्य होऊन जाईल. गुन्हेगारी कृत्यामुळे त्रास होत असेल, अशी चूक पुन्हा करू नका, चांगली कृत्ये करा. बंदिवान जर एक जबाबदार नागरिक म्हणून जीवन जगू इच्छित असेल, तर पुढे समाजाची जबाबदारी आहे. गुन्हेगारी कृत्यातून बाहेर पडलेल्या व्यक्तीचे स्वागत केले पाहिजे.यामूळे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होऊन सत्प्रवृत्त समाज निर्मितीस मदत होईल, असेही पाडवी म्हणाले.